ठाणे : लसीकरण आणि अर्थसंकल्पाच्या मुद्यावर विरोधी पक्षनेते शानू पठाण यांनी मंगळवारी महासभेत आंदोलन केले. मात्र त्यांनी केलेले आंदोलन हे त्यांच्याच अंगलट आले. सभागृहात सुरुवातीला गोंधळ घालणाऱ्या शानू पठाण यांनी काही नगरसेवकांच्या वाॅर्डात कोट्यवधींची कामे सुरु असून त्यांची चौकशी करण्याची मागणी केली. मात्र राष्ट्रवादीचे गटनेते नजीब मुल्ला यांनी मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या मतदारसंघात महापालिकेचा मोठा निधी खर्च करण्यात आला असून अनेक विकासकामे झाल्याचा मुद्दा उपस्थित करून आंदोलने करण्यापेक्षा चर्चा करणे महत्त्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले. याच मुद्यावर महापौर नरेश म्हस्के यांनीदेखील आव्हाड यांच्या मतदारसंघात झालेल्या कामाची चौकशी शानू पठाण यांनीच करायला सांगितल्याचा मुद्दा उपस्थित केल्यामुळे सभागृहात विरोधी पक्षनेत्यांची चांगलीच कोंडी झाली.
मागील काही दिवसांपासून विरोधी पक्षनेते शानू पठाण हे विविध मुद्यांवरून महापालिकेच्या विरोधात आंदोलन करत आहेत. अनेकवेळा त्यांची आंदोलने फसली आहेत. मंगळवारी सर्वसाधारण सभेत त्यांनी लसीकरण आणि अर्थसंकल्पाच्या मुद्यावर गोधळ घातला. सभा सुरू झाल्यानंतरही त्यांनी सभागृहात हा मुद्दा लावून धरला. आम्हाला बजेट मिळत नाही. मात्र काही नगरसेवकांच्या वाॅर्डात रस्त्यांची तसेच इतर कोट्यवधींची कामे सुरु असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला. कोणत्या वाॅर्डात किती निधी दिला याची याची चौकशी करण्याची मागणी त्यांनी यावेळी केली. पठाण यांच्या मागणीनंतर राष्ट्रवादीचेच गटनेते नजीब मुल्ला यांनी महापालिकेच्या माध्यमातून सर्वाधिक कामे ही जितेंद्र आव्हाड यांच्या मतदारसंघात झाली असून यात पक्षीय राजकारण झाले नसल्याचे मुल्ला यांनी सांगितले.
मुल्ला यांच्या माहितीचा धागा पकडत महापौरांनी पठाण यांना कोंडीत पकडले. दोन्ही बाजूने बोलून केवळ आंदोलने करायची असे खडेबोल महापौरांनी सुनावले. कोविड हॉस्पिटलमधील स्टाफ कमी केला की आंदोलन करायचे आणि यावर काही कार्यवाही केली नाही तर अनावश्यक खर्च केला जात आहे असा आरोप करायचा, असा टोलाही महापौरांनी शानू पठाण यांना लगावला. ज्येष्ठ नगरसेवक देवराम भोईर म्हणाले की, आपणही अनेक पदे भूषवली आहेत, मात्र अशाप्रकारे आंदोलने केली नाहीत. सर्वच बाजूने शानू पठाण यांच्यावर टीका झाल्यानंतर त्यांची चांगलीच कोंडी झाली.