उल्हासनगर : गणेशोत्सवानिमित्त महापौर लीलाबाई अशान यांनी आयुक्तांच्या उपस्थितीत अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेऊन विकासकामांबाबत सूचना दिल्या. तसेच पर्यावरण विभागामार्फत माझी वसुंधरा अभियानातील हरित शपथ महापौरांनी उपस्थितांना दिली.
गणेशोत्सवानिमित्त शुक्रवारी झालेल्या या बैठकीला आयुक्त डॉ. राजा दयानिधी, उपायुक्त अशोक नाईकवाडे यांच्यासह विविध विभागांच्याअधिकाऱ्यांची आढावा बैठक घेतली. सुरुवातीला त्यांनी देशात कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याचे सांगून सर्वांनी कोरोनाच्या नियमांचे पालन करण्याचे आवाहन नागरिकांना केले. तसेच, गणेशभक्तांनी बाप्पाच्या विसर्जनासाठी महापालिकेच्या मूर्ती संकलन केंद्राचा उपयोग करावा, असा सल्ला गणेश मंडळ व गणेशभक्तांना दिला. महापौरांनी आढावा बैठकीतकेंद्र शासन व राज्य शासनामार्फत मिळालेल्या निधीतून सुरू असलेले काम वेळेत व मुदतीत पूर्ण करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या.
सफाई कामगारांचे हजेरी शेड दुरुस्ती करणे, नामकरण केलेल्या रस्त्यांना एकाच आकाराचे व एकाच रंगाचे नामफलक लावणे, उल्हास स्टेशन स्कायवॉक, अग्निशमन विभाग अद्ययावत मशिनरी व यंत्रणेसह ठेवणे, आवश्यकतेनुसार वाहन खरेदी करणे, उद्यान विभाग स्वतंत्र ठेवून एजन्सीद्वारे कर्मचारी व देखभाल-दुरुस्तीचा प्रस्ताव तयार करणे आदी अनेक विषयांना महापौरांनी हात घातला.