ठाणे : स्मार्ट सिटी कंपनीच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या विविध प्रकल्पांवर चर्चा करण्यासाठी स्मार्ट सिटी कंपनीचे संचालक आणि अधिकाऱ्यांच्या बुधवारी आयोजित केलेल्या बैठकीतून महापौर नरेश म्हस्के हे बाहेर पडल्याचे सूत्रांनी सांगितले. सुरुवातीला १२ वाजता वेळ देऊन अचानक या बैठकीची वेळ एकची करण्यात आली. मात्र याची कोणतीही कल्पना महापौर तसेच इतर पदाधिकाऱ्यांनाही देण्यात आली नाही. याच मुद्द्यावरून महापौरांनी अधिकाऱ्यांना चांगलेच फैलावर घेतल्याचे समजते.
ठाणे स्मार्ट सिटी मिशनअंतर्गत ठाण्यात विविध महत्त्वाकांक्षी प्रकल्पांची आखणी करण्यात आली आहे. यावरील चर्चेसाठी स्मार्ट सिटी कंपनीचे संचालक तसेच अधिकाऱ्यांच्या बैठकीचे आयोजन केले होते. बैठकीतील आयत्या वेळच्या विषयांचीही संचालकांना मेलद्वारे माहिती देण्यात आली होती. मात्र, बैठकीच्या वेळेबाबत महापौर तसेच इतर संचालकांना कोणत्याही प्रकारची कल्पना दिलेली नव्हती. त्यानंतर बैठकीची वेळ बदलूनही नव्या वेळेची कल्पना अधिकाऱ्यांना दिली नाही. या बैठकीला महापौर म्हस्के पोहोचल्यानंतर त्यांनी या मुद्द्यावरून अधिकाऱ्यांची चांगलीच कानउघाडणी केली. महापौर बैठकीला कधीच उशिरा उपस्थित राहत नाद्त. मात्र,तरीही बदललेल्या वेळेची कल्पना देण्यात आलेली नसून अधिकाऱ्यांनी संचालकांना गृहीत धरू नये, असे सुनावत ते बैठकीतून निघून गेले. महापौरांच्या पाठोपाठ सभागृह नेते अशोक वैती तसेच विरोधी पक्षनेते शानू पठाण यांनीही सभात्याग केला. अधिकाऱ्यांनी माफी मागण्याचा प्रयत्न केला, मात्र, तरीही या तिघांनी सभात्याग केला.
--------------------------------
एखाद्या बैठकीची वेळ बदलली असेल तर ती अधिकाऱ्यांनी सांगणे क्रमप्राप्त आहे. ते न झाल्यामुळे या बैठकीवर माझ्यासह पदाधिकाऱ्यांनी बहिष्कार घातला.
- नरेश म्हस्के, महापौर