ठाणे : ठाणे महापालिकेच्या माध्यमातून भातसा धरणातून सध्या २०० दशलक्ष लिटर पाणी प्रतिदिन उपलब्ध होत आहे. परंतु, शहराला वाढीव १०० दशलक्ष पाणीपुरवठा व्हावा यासाठी मागील काही वर्षांपासून प्रयत्न सुरू आहेत. त्यानुसार येत्या काही महिन्यांत ठाणेकरांना हे वाढीव पाणी टप्याटप्याने उपलब्ध होणार असल्याची माहिती महापौर नरेश म्हस्के यांनी दिली. त्यासाठी नवीन पम्पिंग मशीन पिसे येथे बसविण्याचे काम सुरू आहे. या कामाचा महापौरांनी शुक्रवारी आढावा घेतला.
शहराच्या वाढत्या लोकसंख्येसाठी पाण्याची वाढती मागणी पाहता भातसा धरणातून अतिरिक्त वाढीव पाणी घेण्याबाबत युद्धपातळीवर काम सुरू आहे. सद्यस्थितीतील पाणीपुरवठा व नव्याने उपलब्ध होणाऱ्या अतिरिक्त पाणीपुरवठ्याचे योग्य नियोजन करून संपूर्ण महापालिका क्षेत्नातील नागरिकांना नियमित व पुरेशा दाबाने पाणी मिळेल याबाबतचा सविस्तर आराखडा तयार करून येत्या आठ दिवसांत सादर करण्याची सूचना यावेळी म्हस्के यांनी प्रशासनाला केली. याबाबत पालकमंत्नी एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली व महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांच्या सोबत बैठक घेऊन पाणीवाटपाच्या नियोजनाबाबत निर्णय घेण्यात येईल, असेही त्यांनी यावेळी नमूद केले.