कल्याण-कल्याण डोंबिवली महापालिकेच्या महापौर विनिता राणे यांनी त्यांची नर्सची भूमिका आज पुन्हा पार पाडली. यावेळी कोरोना रुग्णालयात कार्यरत असलेल्या डॉक्टर व नर्स अन्य स्टाफचे मनोबल वाढण्यास अधिक मदत झाली.
महापौर राणे या मुंबईतील नायर रुग्णालयत नर्स होत्या. 32 वर्षे त्यांनी त्याठिकाणी नर्सचे काम केले. रुग्णांची सेवा करण्याच्या कामात विशेष आनंद होता. त्यानंतर त्या राजकारणाकडे वळल्या. राजकारणात आल्यावर त्या कल्याण डोंबिवलीच्या महापौर झाल्या. त्यांनी नर्सचे काम बंद केले होते. कोरोना सारखे महाभयंकर संकट आल्यावर प्रत्येकाने कोरोना योद्धा व्हा असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले. या आवाहनाला प्रतिसाद देत पुन्हा नर्सचे काम करण्याची इच्छा महापौर राणे यांनी व्यक्त केली होती. हे काम करण्याची परवानगी त्यांनी आयुक्तांकडे मागितली होती. त्यांनी नर्सचे काम करण्याची इच्छा व्यक्त केल्याने त्यांचा मुख्यमंत्र्यांनी विशेष उल्लेख केला होता.
त्यांचा होकार मिळताच आज महापौरांनी त्याची गाडी थेट कल्याण डोंबिवली महापालिकेच्या डोंबिवलीतील शास्त्रीनगर रुग्णालयात नेली. शास्त्रीनगर रुग्णालय हे कोरोना रुग्णालय महापालिकेने घोषित केले आहे. या ठिकाणी पोहचताच महापौर राणे यांनी प्रथम पीपीपी किट परिधान केले. त्यानंतर कोरोनाबाधीत उपचार घेत असलेल्या रुग्णांची सेवा केली. मुंबई महापौरांच्या पाठोपाठ राणे या देखील कोरोनाशी दोन हात करण्याकरीता नर्सच्या भूमिकेत उतरल्या आहेत.