अनिकेत घमंडीडोंबिवली : स्मार्ट सिटी प्रकल्पासंदर्भात सध्या १२ ते १८ नोव्हेंबरदरम्यान कोरियामध्ये सुरू असलेल्या स्मार्ट सिटी परिषदेसाठी भारतातून केवळ कल्याण-डोंबिवलीच्या महापौरांनाच निमंत्रित करण्यात आले आहे. महापौर विनीता राणे या परिषदेसाठी शनिवारी तेथे रवाना झाल्या आहेत. राणे यांनी ‘लोकमत’ला दिलेल्या माहितीनुसार, कोरियामध्ये सोमवारी सुरू झालेल्या या परिषदेत पाण्याच नियोजन कसे करावे या विषयावर मार्गदर्शन करण्यात आले. त्यात छोटे पाणवठे, बंधारे, महापालिका हद्दीतील टोलेजंग इमारतीत पावसाच्या पाण्याचे संवर्धन, विहिरीच्या पाण्याचा साठा करून भूजल पातळी कशी वाढेल, यावर भर देण्यात आला. केडीएमसी हद्दीतील विकासासाठी या परिषदेतील माहिती खूप मोलाची ठरणार आहे.
‘कोरियासोबत केडीएमसीच्या प्रकल्पासंदर्भातही चर्चा होणार आहे. त्यात नानाविध प्रकल्प राबवण्यासाठी तेथील शिष्टमंडळाने सर्वतोपरी सहकार्याची तयारी दर्शवली आहे. कोरियाचे शिष्टमंडळ कल्याण-डोंबिवलीच्या दौºयावर असताना त्यांनी ‘पलावा सिटी’चा अभ्यास केला होता. महापालिका हद्दीत असे गृहनिर्माण प्रकल्प होणे आवश्यक आहे. त्यातून विकास आणि स्मार्ट सिटीचा चेहरा शहरांना मिळू शकतो. तसेच बहुतांशी महापालिका हद्दीत भेडसावणारी वाहतूककोंडी आणि प्रदूषणाच्या समस्यांवरही चर्चा होणार आहे. कोंडी फोडण्यासाठी सिग्नल यंत्रणा, त्याचे नियोजन, वाहनचालकांची शिस्त, वाहतूक पोलिसांची भरीव कामगिरी, लेनची शिस्त या सर्व तांत्रिक मुद्यांवर चर्चा होणार आहे,’ असे राणेम्हणाल्या.‘घनकचरा व्यवस्थापनाच्या काही प्रकल्पांना भेटी दिल्या जाणार आहेत. केडीएमसीने प्लास्टिक बंदी लागू केली आहे. मात्र, त्याची काटेकोर अंमलबजावणी करण्यावर भर द्यावा लागणार आहे. तसेच ओला, सुका कचरा वर्गीकरणाची आवश्यकताही नागरिकांना पटवून द्यावी लागणार आहे. त्यादृष्टीने विशेष कार्यशाळा छोट्या स्वरूपावर तातडीने घेणे अत्यावश्यक आहे,’ असे त्यांनी सांगितले.‘देशाची संस्कृती एकसंध राहण्यासाठी तेथील सर्वसामान्य नागरिकही प्रचंड स्वाभिमान बाळगत आहे. सेऊल सीटी टूरमध्ये त्यांच्या संस्कृती, परंपरेचे दर्शन आम्हाला घडणार आहे,’ असेही राणे यांनी सांगितले. केडीएमसीचे आयुक्त गोविंद बोडके यांनाही या परिषदेचे आमंत्रण होते. परंतु, त्यांना म्हैसूर येथे प्रशिक्षणाला जाणे बंधनकारक आहे. त्यामुळे ते कोरियाला येऊ शकले नाहीत. बोडके म्हणाले की, ‘महापालिकेच्या भविष्यातील प्रकल्पांच्या दृष्टीने ही परिषद महत्त्वाची आहे. केंद्राच्या माध्यमातून स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत उंबर्डे, सापार्डे येथील विकासासाठी कोरियन कंपनीने सहकार्याची तयारी दर्शवली आहे. त्यादृष्टीने या परिषदेला महापौर गेल्या आहेत. कोरियासोबत महापालिकेचे संबंध अधिक दृढ होण्यासाठी या परिषदेतील सहभागाचा निश्चित लाभ होणार आहे.’पाणी, पर्यावरण संवर्धनावर प्रचंड काम‘पाण्याचे संवर्धन, विशेषत: सांडपाण्यावर प्रक्रिया करून पुर्नवापर, तसेच पाण्याचे स्त्रोत आदी विषयांवर कोरियाने प्रचंड काम केले आहे. तेथील धरण, कालवे बघितल्यावर त्यांची भविष्याकडे बघण्याची दूरदृष्टी वाखाणण्याजोगी आहे. पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीनेही कोरियाने अनेक योजना राबवल्या आहेत. स्वच्छतेसंदर्भातही प्रत्येक नागरिक जागरूक आहे,’ असे राणे म्हणाल्या.