लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : प्रभाग रचनेवरून शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये वादाची ठिणगी पडली असतानाच, महापौरांच्या जेवणावळीवर राष्ट्रवादीने बहिष्कार घातल्याने, ठाणे महापालिका निवडणुकीत आघाडी होणार का, याबाबत साशंकता निर्माण झाली असतानाच, आगामी महापालिका निवडणुकीत शिवसेनेचे ९० नगरसेवक निवडून येतील, असे भाकीत महापौर नरेश म्हस्के यांनी गुरुवारी रात्री उशिरापर्यंत चाललेल्या महासभेत केले. यापूर्वी १०० जागांवर विजय मिळेल, असा दावा करणाऱ्या शिवसेनेने आपले संख्याबळ १० ने घटविल्याने प्रभाग रचनेत सेनेला राष्ट्रवादीने झटका दिल्याचा हा परिपाक असल्याचे बोलले जात आहे. उर्वरित ५२ जागांवर निवडून येण्यासाठी विरोधी पक्षाच्या नगरसेवकांना त्यांनी शुभेच्छा दिल्या. त्यांच्या या वक्तव्यातून शिवसेना आता स्वबळावरच लढणार असल्याचे संकेत मिळाले.
गुरुवारी रात्री ११ वाजेपर्यंत ठाणे महापालिकेची शेवटची महासभा रंगली होती. यावेळी महापौरांवर स्तुतिसुमने उधळण्याबरोबर काहींनी टीका केली. काहींना महापौरांनी शालजोडीतील हाणले. पाच वर्षांच्या कार्यकाळाचा हा कौतुक सोहळा सुरू असताना शिवसेनेचे नगरसेवक राम रेपाळे यांनी शिवसेना ९० जागांवर निवडून येणार असल्याचा दावा केला. त्याला महापौर म्हस्के यांनी दुजोरा देत राष्ट्रवादीला सावधानतेचा इशारा दिला.
शिवसेना महापालिकेत ९० जागांवर निवडून येईल, असे सांगताना उर्वरित जागेवर विरोधकांना निवडून येण्यासाठी त्यांनी शुभेच्छा दिल्या. एकीकडे शुभेच्छा देत असताना राष्ट्रवादीकडून कशा पद्धतीचे वर्तन झाले, याचा पाढा त्यांनी वाचला. मागील काही दिवसापासून शिवसेना आणि राष्ट्रवादीत प्रभाग रचनेवरून चांगलेच वादंग सुरू आहे. या वादावर पडदा टाकण्याचे काम गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी पत्रकार परिषद घेऊन करण्याचा प्रयत्न केला.
...तर आम्हाला आमचा मार्ग माेकळा!
आम्ही आघाडीसाठी तयार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. त्यानंतर पालकमंत्री शिंदे आणि आव्हाड यांनी पुन्हा आघाडीच्या आणाभाका घेतल्या. मात्र म्हस्के यांनी आयोजित केलेल्या स्नेहभोजनावर राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी टाकलेला बहिष्कार त्यांच्या जिव्हारी लागला. तुम्हाला असेच वागायचे असेल तर आम्हाला आमचा मार्ग मोकळा असल्याचे सांगत, म्हस्के यांनी आघाडी तुटल्याचेच संकेत दिले. महापालिकेवर यापूर्वी भगवा होता, आता भगवा आहे आणि पुढेही भगवाच फडकणार असल्याचे संकेतही त्यांनी दिले.