मीरारोड - मीरा भाईंदरमधील रस्ते हे गणेशोत्सवापूर्वी दुरुस्त करून खड्डे भरावे, असे आदेश महापौर ज्योत्स्ना हसनाळे यांनी याबाबत बोलावलेल्या बैठकीत प्रशासन व ठेकेदारांना दिले.
बुधवार २५ ऑगस्ट रोजी महापालिकेच्या स्थायी समिती सभागृहात झालेल्या बैठकीत रस्ते गणेशोत्सवापूर्वी दुरुस्त करण्याचे आदेश महापौर ज्योत्स्ना हसनाळे यांनी दिले आहेत. शहरातील डांबरी रस्त्यांवर ठिकठिकाणी खड्डे पडले असून निकृष्ट दर्जा व कामाची अतांत्रिक पद्धत कारणीभूत असल्याचा आरोप सातत्याने होत असतो. त्यातच यंदा एमएमआरडीए मार्फत मेट्रोचे काम सुरु असून त्या कामासोबतच छत्रपती शिवाजी महाराज मार्गाचे असफाल्ट पद्धतीने पुन:पृष्ठीकरणाचे काम हाती घेण्यात आले. परंतु पावसाळा सुरू झाल्याने काही भागातील कामे अर्धवट राहिली आहेत. जेणेकरून पावसाळ्यात अर्धवट राहिलेल्या रस्त्याच्या ठिकाणी खड्डे पडले. परंतु जेथे काम पूर्ण झाले तो रस्त्याचा भाग चांगला आहे. हे काम २२ कोटी रुपयांचे असून मे. जे. कुमार इन्फ्रा प्रोजेक्ट लि. या ठेकेदारास दिले आहे.
महापालिकेच्या ताब्यातील रस्त्यांवर खड्डे हे दरवर्षी पडतात. तरी यंदा मात्र एमएमआरडीएने केलेल्या मुख्य रस्त्याच्या अर्धवट कामामुळे पडलेल्या खड्ड्यांचा उपयोग पालिकेतील सत्ताधारी राजकीय आरोप- प्रत्यारोपांसाठी करून घेत आहेत.
खड्डेमय रस्त्यांमुळे होणारा जाच, अपघात व तोंडावर आलेला गणेशोत्सव यामुळे रस्त्यांवरील खड्डे तातडीने बुजवून दुरुस्तीची मागणी केली जात होती. त्या अनुषंगाने महापौर ज्योत्स्ना हसनाळे व आयुक्त दिलीप ढोले यांच्यासमवेत, शहर अभियंता शिवाजी बारकुंड, कार्यकारी अभियंता दीपक खांबीत तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंते, एमएमआरडीएच्या कार्यकारी अभियंता योजना पाटील, मे. जे. कुमार इन्फ्रा प्रोजेक्ट लि. यांचे अभियंता व संबंधित ठेकेदार हे उपस्थित होते.
बैठकीत येत्या ५ सप्टेंबरपर्यंत रस्त्यांच्या दुरुस्तीचे काम अभियंत्यांच्या निरीक्षणाखाली मुदतीत पूर्ण करावे, रस्त्यांच्या दुरुस्तीचे काम करताना लाईव्ह लोकेशन ग्रुपवर अपलोड करावे, रस्त्यांवर काम करतेवेळी कामाचा दर्जा समांतर, रस्त्याची जाडी नियंत्रित ठेवा. येणाऱ्या नवरात्रौत्सवात रस्त्यांवर पुन्हा खड्डे पडून नागरिकांना त्रास होणार नाही याची खबरदारी घ्यावी आदी सूचना महापौर यांनी दिल्या आहेत.