ठाणे: गेले काही दिवस सातत्याने सुरू असलेल्या पावसामुळे ठाणे शहरातील रस्त्यांवर ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. पावसाची उघडीप मिळताच खड्डे दुरुस्त करण्याची कार्यवाही महापौर नरेश म्हस्के यांनी स्वतः उपस्थित राहू्न संबंधित विभागाकडून शनिवारी रात्री उशिरापर्यंत करून घेतली. यावेळी स्थायी समिती सभापती संजय भोईर,अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी, नगर अभियंता अर्जुन अहिरे आदी उपस्थित होते.
शहरातील रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांमुळे वाहनचालकांना, तसेच रस्त्यावरून जाणाऱ्या नागरिकांनादेखील त्रास सहन करावा लागत होता. मात्र पावसामुळे काम करणे शक्य होत नव्हते. पावसाची उघडीप मिळताच तत्काळ खड्डे बुजविण्याचे आदेश महापौरांनी प्रशासनास दिले होते. त्यानुसार प्रभाग क्र. १९ मधील एलबीएस रोड, शिवराज हाॅटेलजवळील रस्ता, कोपरी पूल, तुळजाभवानी मंदिर, गुरूद्वारा, हरीनिवास सर्कल, आराधना सिनेमा, तीन पेट्रोल पंप येथील खड्डे बुजविण्यात आले. माजिवडा जंक्शन, भिवंडी बायपास रस्ता, मुंब्रादेवी काॅलनी या ठिकाणच्या रस्त्यावरील खड्डे दुरुस्त करण्याची कार्यवाही करण्यात आली. घोडबंदर रोडवरील पुलावरील तसेच मेट्रोच्या कामामुळे पडलेले खड्डे बुजविण्याबाबत राज्य रस्ते विकास महामंडळाच्या (एमएसआरडीसी) अधिकाऱ्यांना कळविण्यात आले आहे. त्यांच्याकडूनही लवकरच काम सुरू होणार आहे. परंतु त्यांच्याकडून कार्यवाही झाली नाही तर वाहनचालकांच्या सोयीसाठी ते काम महापालिकेच्या वतीने करण्यात येईल, असेही महापौरांनी म्हटले आहे.
ठाणे शहरातील विविध ठिकाणच्या रस्त्यावर पडलेले खड्डे भरण्याची कार्यवाहीदेखील लवकरात लवकर करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
---------------