ठाणे : कोरोनाच्या कारणास्तव यंदाही ठाणे महानगरपालिका आणि ठाणे जिल्हा ॲथलेटिक्स असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात येणारी ठाणे महापौर वर्षा मॅरेथॉन गेल्या वर्षाप्रमाणे यंदाही रद्द होणार आहे. कोरोनामुळे महापालिकेची आर्थिक स्थितीही डबघाईला आल्याने या स्पर्धेवर केला जाणारा लाखो रुपयांचा खर्च महापालिकेला परवडणार नाही. हे लक्षात घेऊन ही स्पर्धा सलग दुसऱ्या वर्षीही रद्द करण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
ठाणे महापौर वर्षा मॅरेथॉन स्पर्धा राज्य पातळीवरील असल्यामुळे महाराष्ट्राच्या सर्व जिल्ह्यातून साधारणपणे १५ ते २० हजार खेळाडू या स्पर्धेमध्ये सहभागी होत असतात. देश व जागतिक पातळीवर धावपटू निर्माण करण्याच्या उद्देशाने या स्पर्धेचे आयोजन करण्यात येत असते. गेली अनेक वर्षे ठाणे महापौर वर्षा मॅरेथॉन स्पर्धा संपूर्ण राज्याचे आकर्षण राहिली आहे. मान्सून सुरू झाल्यावर ठाणेकर नागरिकांना या स्पर्धेची आतुरता लागलेली असते. दरवर्षी या स्पर्धेकरिता महापालिका मोठ्या प्रमाणावर तयारी करते. याकरिता विविध विभागांच्या बैठका घेण्यात येतात. विशेष म्हणजे आतापर्यंतच्या वर्षा मॅरेथॉन स्पर्धेवर सत्ताधारी शिवसेनेचे वर्चस्व राहिले होते. मागील वर्षी कोरोनाच्या संकटाच्या पार्श्वभूमीवर ३१ वी ठाणे महापौर वर्षा मॅरेथॉन स्पर्धा रद्द केली होती. यंदाही तीच परिस्थिती आहे. कोरोनाची दुसरी लाट ओसरली असली तरी अद्याप धोका टळला नाही. आजही ठाणे महापालिका क्षेत्रात दिवसाला सरासरी ९० च्या आसपास कोरोना रुग्ण आढळत आहेत. त्यातच येत्या दीड महिन्यात कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. विशेष म्हणजे कोरोनापायी ठाणे महापालिकेची आर्थिक स्थिती बिघडलेली आहे. परिणामी या स्पर्धेवर केला जाणारा लाखो रुपयांचा खर्च महापालिकेला परवडणारा नाही. दरवर्षी साधारण ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात ही स्पर्धा होते. मात्र, गतवर्षीप्रमाणे यंदाही कोरोनाच्या कारणास्तव सुरक्षेचा उपाय म्हणून ही स्पर्धा रद्द करण्यात येणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली.