ठाणे : कोठारी कम्पाउंडच्या कारवाईच्या मुद्यावरून बुधवारची महासभा होणार की नाही, महापौर, सत्ताधारी आणि विरोधक काय भूमिका घेणार, याकडे सर्वांचेच लक्ष होते. त्यानुसार, ती सुरू होताच, सर्वपक्षीय सदस्यांनी कारवाईच्या मुद्यावरून प्रशासनाला चांगलेच धारेवर धरले. दुसरीकडे आयुक्तांनीदेखील १०० टक्के कारवाईचे आश्वासनही दिले. परंतु, नोटिसा न बजावता कारवाई केली असती, तर आनंद झाला असता, असे खडेबोल महापौर मीनाक्षी शिंदे यांनी आयुक्तांच्या उपस्थितीत प्रशासनाला सुनावले.गावदेवी परिसरातील गाळे तोडताना कोणत्याही प्रकारची नोटीस न देता गरिबांच्या बांधकामांवर बुलडोझर फिरवला. परंतु, कोठारी कम्पाउंडमधील बांधकामांना साधे सीलही ठोकले नाही. अनधिकृत बांधकामे पालिका अधिकाºयांच्या सहभागाशिवाय होऊच शकत नाहीत, मात्र, नगरसेवकांना चोर ठरवले जाते, अशा शब्दांत त्यांनी प्रशासनाचा समाचार घेतला.नियम डावलून सुरू असलेल्या कोठारी कम्पाउंडमधील पब आणि हुक्का पार्लरवर कोणत्याही प्रकारची नोटीस न देता कारवाई करण्याचे स्पष्ट आदेश महापौर मीनाक्षी शिंदे यांनी गेल्या गुरुवारी झालेल्या महासभेत दिले होते. कारवाई झाल्यानंतरच पुढची महासभा होईल, असेही स्पष्ट केले असतानाही महापौरांचेही आदेश डावलून प्रशासनाने अजूनही त्यावर कारवाई केलेली नसल्याचे बुधवारी झालेल्या महासभेत उघड झाले. यामुळे सभा सुरू होताच विरोधी पक्षनेते मिलिंद पाटील यांनी या मुद्याला हात घातला. मागील सभेत महापौरांनी आदेश दिल्यानंतर कोठारी कम्पाउंडवर काय कारवाई केली, अशी विचारणा त्यांनी प्रशासनाला केली. यावर अतिक्र मण विभागाचे उपायुक्त अशोक बुरपुल्ले यांनी नोटीस दिल्याचे स्पष्ट केल्यानंतर महापौरांनी कारवाई केल्याशिवाय पुढची महासभा होऊ देणार नाही, या आपल्या आदेशाची आठवण त्यांना करून दिली. त्यानंतर, सर्वच नगरसेवकांनी केवळ कोठारी कम्पाउंडच नव्हे, तर संपूर्ण शहरातीलच हुक्का तसेच पबवर कारवाई करण्याची मागणी केली. पालिका आयुक्तांनी प्रशासनाची बाजू सावरून कोठारी कम्पाउंडवर कायद्याच्या चौकटीत कारवाई करण्याचे आश्वासन त्यांनी दिले. मात्र, आदेश देऊनही कोठारी कम्पाउंडला सील ठोकण्याची कारवाई प्रशासन करू न शकल्याने महापौरांनी कानउघाडणी केली.आता कोठारी कम्पाउंडवर कारवाईसाठी कायदा तपासला जातो. ज्या वेळी गरिबांना एका क्षणात बेघर केले जाते, तेव्हा कुठे कायदा जातो. एकाला एक न्याय, गरिबांना दुसरा न्याय, हे प्रशासनाचे चुकीचे धोरण असून जोपर्यंत कोठारी कम्पाउंडवर कारवाई होत नाही, तोपर्यंत महासभा कधी घ्यायची, याचा निर्णय मी घेईन, असे खडेबोल त्यांनी प्रशासनाला सुनावून महासभा तहकूब केली.>‘कोठारी’ मध्ये न फिरकण्याचे आयुक्तांचेच आदेश!कोठारी कम्पाउंडकडे फिरकू नका, असे आयुक्तांचे आदेश असल्याचा आरोप माजी उपमहापौर मुकेश मोकाशी यांनी सभागृहात केला. त्यांच्या आरोपांमुळे सभागृहात चांगलाच गदारोळ झाला. मोकाशी खोटे बोलत असल्याचे अतिक्र मण विभागाचे उपायुक्त अशोक बुरपुल्ले यांनी सांगितल्याने काही वेळ सभागृहात गोंधळ झाला. तत्कालीन सहायक आयुक्त संजय शिंदे यांचे हे वक्तव्य असल्याचेही मोकाशी यांनी सभागृहात सांगितले.>...तर सर्व हुक्का पार्लर, पब बंद करेन - जयस्वालकोठारी कम्पाउंडमधील बांधकामावर कारवाई करण्यासंदर्भात सभागृहाचा निर्णय येण्याआधीच सर्वेक्षण सुरू झाले होते, अशी माहिती पालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी सभागृहात दिली. त्यानंतर, आतापर्यंत २६० अन्वये २६ आणि २६७ अन्वये १० जणांना नोटिसा बजावल्याचे सांगितले. त्यामुळे महापौरांच्या आदेशाचे प्रशासनाने पालन केल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मात्र, हा केवळ कोठारी कम्पाउंडचा विषय नसून, जर सभागृहाने ठराव केला तर शहरातील सर्वच हुक्का आणि पब पोलिसांच्या सहकार्याने बंद करेन, अशी भूमिकाही आयुक्तांनी मांडली. केवळ एवढेच नव्हे, तर ज्या हॉटेल्स किंवा इतर आस्थापनांना फायरची एनओसी नसेल, ते सर्व बार आणि हॉटेल्स बंद करेन. अधिकृत इमारतींत चुकीच्या पद्धतीने वापर सुरू असेल, तरीही त्यावरदेखील कारवाई करेन, अशी हमी त्यांनी दिली. मात्र, कारवाईच्या वेळेस कोणीही कारवाई का करता, म्हणून तक्र ार करू नका, असा इशारादेखील आयुक्तांनी लोकप्रतिनिधींना दिला.
अनधिकृत बांधकामांवरून महापौरांचा प्रशासनावर हल्लाबोल, आयुक्त प्रथमच झाले निरूत्तर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2017 3:30 AM