भिवंडी : कोरोना अजून गेेलेला नसतानाही महापौर चषक क्रिकेट सामन्यांचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा तत्काळ रद्द करावी, अशी मागणी काँग्रेसचे नगरसेवक अरुण राऊत यांनी केली आहे.
या स्पर्धेचे महापौर प्रतिभा पाटील यांच्या हस्ते रविवारी उद्घाटन झाले. या प्रसंगी उपमहापौर इम्रान खान, सभागृहनेते शाम अग्रवाल, विरोधी पक्षनेते मतलूब सरदार व स्पर्धेचे आयोजक विलास पाटील उपस्थित होते. यंदा या स्पर्धेत संपूर्ण शहर व तालुक्यातून तब्बल १२० संघ सहभागी झाले आहेत. मात्र ही स्पर्धा वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. कोरोना संकट असतांनाही महापौरांनी कोरोना नियम धाब्यावर बसवून स्पर्धा आयोजित केली असल्याने शहरात कोरोना वाढल्यास त्यास जबाबदार कोण राहणार? महापौर स्वतःच्या प्रसिद्धीसाठी नागरिकांचा जीव धोक्यात घालून स्पर्धा आयोजित केल्याने ती रद्द करावी तसेच या स्पर्धेसाठी होणारा खर्च नेमका कुठल्या निधीतून करण्यात आला आहे, याचे स्पष्टीकरणही महापौरांनी द्यावे, अशी मागणी राऊत यांनी केली आहे.
तर या स्पर्धेच्या माध्यमातून सर्व जातीधर्मीय समाजात एकोपा नांदावा, खिलाडूवृत्ती निर्माण व्हावी यासाठी स्पर्धा आयोजित केल्याचे आयोजक पाटील यांनी सांगितले.