कल्याण : एमसीएचआय बिल्डर संघटनेने सोमवारी कल्याण-डोंबिवली महापालिका हद्दीत ‘झीरो स्टॅम्पड्युटी’ची घोषणा केली आहे. त्यामुळे नवे घर खरेदी करणाऱ्यांकडून स्टॅम्पड्युटी आकारली जाणार नसल्याने त्यांना तीन ते सहा लाख रुपयांचा फायदा होणार आहे.एमसीएचआयच्या कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती देण्यात आली. या प्रसंगी एमसीएचआयचे अध्यक्ष श्रीकांत शितोळे, पदाधिकारी रवी पाटील, रोहित दीक्षित, विकास जैन, भरत छेडा आदी उपस्थित होते.
शितोळे यांनी सांगितले की, राज्य सरकारने स्टॅम्पड्युटीमध्ये तीन टक्के सूट दिली आहे. त्यानंतर, एमसीएचआयनेही तीन टक्के सूट दिली आहे. त्यामुळे केडीएमसी हद्दीत नवे घर खरेदी करणाºया ग्राहकाला आता स्टॅम्पड्युटीच भरावी लागणार नाही. एमसीएचआयचे सदस्य असलेल्या ५० बिल्डरांनी स्टॅम्पड्युटी घेणार नाही, असे संघटनेला लिखित स्वरूपात हमीपत्र दिले आहे. तर, अन्य ७५ बिल्डर सदस्यांनी स्टॅम्पड्युटीत सूट देण्याचे मान्य केले आहे. या योजनेचा लाभ ग्राहकांना ३१ आॅक्टोबर २०२० पर्यंत घेता येणार आहे.
ते पुढे म्हणाले, एमएमआर क्षेत्रात परवडणारी घरे कल्याण-डोंबिवलीत आहेत. लॉकडाऊनच्या काळात सरकारने नागरिकांना घरीच राहण्याचा संदेश दिला होता. कोरोनापासून वाचण्यासाठी नागरिकांच्या मनात स्वत:चे घर असावे, अशी भावना जागृत झाली. लॉकडाऊनचा फटका रिअल इस्टेट व्यवसायाला बसला आहे. मात्र, सध्याच्या अनलॉकमध्ये पुन्हा नव्या घरांच्या मागणीत वाढ झाली आहे. ही मागणी १० ते १५ टक्क्यांनी वाढली आहे. त्यामुळे नवे घर खरेदी करणाºयांना झीरो स्टॅम्पड्युटी योजनेचा लाभ होणार आहे.
‘बँकेचे हप्ते भरण्यात सूट द्या’
रिअल इस्टेट व्यवसायाला लॉकडाऊन काळात आर्थिक फटका बसला आहे. त्यामुळे केंद्र सरकारने जीएसटी व बँकेचे हप्ते भरण्यात काही सूट द्यावी, अशी मागणी एमसीएचआयने केंद्र सरकारकडे केली असल्याचे अध्यक्ष शितोळे यांनी सांगितले.