कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिका हद्दीतील २७ रस्त्यांचे सुशोभीकरण करण्यासाठी एमसीएचआय क्रेडाई या बिल्डर संघटनेने पुढाकार घेण्याची तयारी दर्शविली असल्याची माहिती एमसीएचआयचे अध्यक्ष श्रीकांत शितोळे यांनी बुधवारी दिली.
आयुक्तांसोबत एमसीएचआयची नुकतीच बैठक पार पडली. या बैठकीस एमसीएचआयचे पदाधिकारी उपस्थित होते. यापूर्वीही एमसीएचआयने स्वच्छ व सुंदर शहरासाठी पुढाकार घेतला आहे. ओला सुका कचरा वर्गीकरणासाठी पुढाकार घेऊन महापालिकेच्या शून्य कचरा मोहिमेला हातभार लावला आहे. बड्या सोसायट्यांनी ओला, सुका कचरा वर्गीकरणात सहभागी होण्याचे आवाहन एमसीएचआयने केले होते. शहरातील प्रमुख रस्त्यांचे दुभाजक सुशोभित करण्याचेही काम करण्यात आलेले आहे. याशिवाय कोरोना काळात एमसीएचआयने सॅनिटायझर, मास्क, अन्नधान्यांचे वाटप केले आहे. कोरोनाची पहिली लाट आली तेव्हा बांधकाम प्रकल्पावर काम करणाऱ्या मजुरांना रेशन भरुन देण्याचे काम केले आहे. या विविध उपक्रमांतून एमसीएचआयने सामाजिक बांधिलकी जपण्याचा प्रयत्न केला असल्याचे शितोळे यांनी सांगितले. कोरोना काळात केलेल्या विशेष कामगिरीची दखल घेत केंद्र सरकारने केडीएमसीचा कोरोना इन्वोशन अवाॅर्डने गौरव केला. आयुक्तांनी केलेल्या विशेष कामगिरीमुळेच महापालिकेस अवाॅर्ड मिळाला असल्याने शितोळे यांच्यासह माजी अध्यक्ष रवी पाटील, पदाधिकारी राजन बांदेलकर, विकास जैन, मिलिंद चव्हाण, अरविंद वरक, जयेश तिवारी, संजय जाधव, विनायक जाधव यांनी आयुक्तांची भेट घेऊन त्यांच्या सत्कार केला.
------------------------