ठाणे : ठाणे जिल्हा मध्यवर्ती कारागृहातील रुग्णालयात चांगल्या प्रकारे उपचार होत नसल्याचे कारण देऊन मोक्कातील आरोपी अनुप गोंधळी याने धिंगाणा घातल्याचा प्रकार मंगळवारी घडला. याप्रकरणी ठाणेनगर पोलीस ठाण्यात त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.कारागृहातील रुग्णालयात व्यवस्थित उपचार होत नसल्याच्या रोषातून त्याने रुग्णालयातच तोडफोड केली. डॉक्टरलाही बाहेर आल्यानंतर चक्क बघून घेण्याची धमकीही दिली. मंगळवारी दुपारी १२ वा.च्या सुमारास गोंधळीला कारागृहातील रुग्णालयात तपासणीसाठी आणले होते. डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर कारागृहातील रु ग्णालयातच दाखल होण्याचा त्याला सल्लाही दिला. परंतु, कारागृहात उपचार नीट होत नसल्याचे कारण देत बाहेरील रुग्णालयात पाठवण्याची त्याने मागणी केली. यातूनच त्याने डॉक्टरांनाही शिवीगाळ केली. तसेच बाहेर आल्यानंतर १० दिवसांत बघून घेण्याची धमकीही दिली. डॉक्टर बाहेर गेल्यानंतरही त्याने रुग्णालयात धिंगाणा घातला. कारागृह कर्मचाऱ्यांनी त्याला कसेबसे शांत करण्याचा प्रयत्न केल्याची माहिती सूत्रांनी दिली. दरम्यान, कारागृहाच्या अधिका-यांनी मात्र या विषयावर भाष्य करण्यास नकार दिला.