ठाणे : उत्तर प्रदेशातील मेफेड्रॉन (एमडी) या अमली पदार्थाच्या पावडर निर्मितीचा आणखी एक कारखाना ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या युनिट एकच्या पथकाने उद्ध्वस्त केल्याची माहिती पोलिस उपायुक्त शिवराज पाटील यांनी मंगळवारी दिली. यामध्ये वाराणसीमधील सूत्रधार संदीप तिवारी यासह सहाजणांना अटक केली आहे. त्यांच्याकडून एमडी पावडरसह २० कोटी १८ लाख ४९ हजार ७१८ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
यापूर्वी याच प्रकरणात ठाण्यातील कासारवडवली पोलिस ठाण्यात २४ जानेवारी २०२४ रोजी एनडीपीएस अंतर्गत गुन्हा दाखल झाला होता. यामध्ये आफताब मलाडा याच्यासह सातजणांना अटक केली होती. सुरुवातीला केवळ १५ ग्रॅम एमडी पावडरसह दोघांना ठाणे पोलिसांनी अटक केली होती. सखोल चौकशीत उत्तर प्रदेशातून २७ कोटी ७८ लाख ५५ हजारांचा मुद्देमालासह एमडी पावडर निर्मितीचा कारखाना उद्ध्वस्त केला होता. यामध्ये क्रिस्टल पावडर बनविण्याच्या सामुग्रीचा मोठ्या प्रमाणात समावेश होता.
गुन्हे अन्वेषण विभागाचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक दिलीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक रूपाली पोळ यांच्यासह चार पथकांनी पुन्हा उत्तर प्रदेशातील वाराणसीमध्ये वेषांतर करून दोन आठवडे तळ ठोकला. यूपीच्या विशेष कृती दलाचे अतिरिक्त अधीक्षक विनोद सिंग यांच्या मदतीने आरोपी विजय पाल आणि बिंदू यांचा शोध घेतला. या टोळक्याने आजमगढ येथे अमली पदार्थ बनविण्याचा कारखाना सुरू केल्याची माहिती मिळाली. त्याच आधारे ठाणे पोलिसांनी यूपीच्या एसटीएफच्या मदतीने जौनपूर व आजमगढ दि. २४ एप्रिल रोजी छापा टाकला.
यामध्ये संदीप तिवारी, ललित उर्फ सोनू राकेश चंद्र पाठक, अनिल जयस्वाल, (रा. नालासोपारा, जि. पालघर), नीलेश पांडे (रा. गुजरात, मूळ रा. उत्तर प्रदेश), विजय रामप्रसाद पाल आणि बिंदू उर्फ जिलाजीत जोखई पटेल, (रा. वाराणसी) यांना अटक केली. त्यांच्या आजमगड येथील कारखान्यातून २५ ग्रॅम एमडी क्रिस्टल पावडर, केमिकल मिक्स करून २० किलोपर्यंत एमडी हा अमली पदार्थ तयार होत असलेले मिश्रण, आरोपींची कार आणि इतर सामुग्री असा २० कोटी १८ लाखांचा मुद्देमाल जप्त केला. कच्चे मटेरियल, केमिकल, मोबाइल फोन, वाहने असा ऐवज जप्त केला आहे. सखोल चौकशीत दिलीप जयस्वाल यालाही अटक करण्यात आली आहे. आराेपींना पोलिस कोठडीयातील संदीप तिवारी उर्फ डॉक्टर हा या टोळीला तसेच यापूर्वी अटक केलेल्या आरोपींना आणि मुंबईतील ड्रग्ज रॅकेटमध्येही एमडी पावडर बनविण्यासाठी केमिकलच्या मिश्रणाचा फॉम्युला तयार करून देत असल्याचे तपासात निष्पन्न झाले. यामध्ये आतापर्यंत १४ आराेपींना अटक केली आहे. त्यांच्याकडून ४८ काेटी १४ लाख १७ हजारांचा मुद्देमाल जप्त केल्याचे उपायुक्त शिवराज पाटील यांनी सांगितले. नव्याने अटक केलेल्या संदीप तिवारी याच्यासह सहाजणांना ६ मेपर्यंत पाेलिस काेठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत.