भाईंदर : मीरा-भाईंदर महापालिकेच्या आरोग्य विभागातील दोन 'मी टू' प्रकरणांवर सोमवारी विशाखा समितीपुढे सुनावणी घेण्यात आली. त्यात एकाने समितीसमोर माफीनामा सादर केल्याने समितीने समज देत प्रकरण मिटवले तर दुसऱ्या विरोधात तक्रार देणारी महिलाच अनुपस्थित राहिल्याने त्याची सुनावणी पुढील सोमवारपर्यंत लांबविण्यात आली.
पालिकेच्या आरोग्यविभागांतर्गत नवघर प्राथमिक आरोग्य केंद्रातील औषध निर्माण अधिकारी स्वप्नील देव हा तेथील महिला कर्मचाऱ्यांना कोणतेही कारण नसताना सर्वांसमोर आक्षेपार्ह भाषेत बोलून त्यांची अब्रू काढत असे. दोन कर्मचाऱ्यांना एकमेकांबद्दल खोटे सांगून त्यांच्यात तो भांडणे लावून देत होता. महिला कर्मचाऱ्यांशी उद्धटपणे बोलून त्यांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करीत. त्या कर्मचाऱ्यांसोबत व्हाटस्अॅपवर अश्लिल भाषेत मॅसेज टाईप करुन तो सहकाऱ्यांना दाखवून संबंधित महिला माझ्यावर किती खूश आहे, असे भासवून त्यांची बदनामी करीत. महिला कर्मचाऱ्यांच्या कामात मुद्दाम व्यत्यय आणून तो महिला कर्मचाऱ्यांकडे लज्जास्पद नजरेने पाहत. त्याच्या या स्वभावाला कंटाळलेल्या चार महिला कर्मचाऱ्यांनी दोन महिन्यांपूर्वी केंद्र प्रमुखांकडे तक्रारी दाखल केल्या. त्याची दखल घेत केंद्र प्रमुखाने ती तक्रार आयुक्त बालाजी खतगावकर यांच्या आदेशानुसार पालिकेतील शारीरिक व मानसिक छळामुळे पिडीत ठरलेल्या महिलांना न्याय मिळवून देण्यासाठी स्थापन केलेल्या विशाखा समितीकडे दाखल केली. त्याचप्रमाणे भार्इंदर येथील भारतरत्न स्व. पंडीत भीमसेन जोशी रुग्णालयातील अधिक्षक शरद निखाते हे शल्यचिकीत्सक असतानाही त्यांनी एका महिला रुग्णाची बाह्य तसेच आंतरिक शारीरिक तपासणी केली. मात्र, त्यावेळी डॉ. निखाते यांनी रुग्णालयातील स्त्री कर्मचारी अथवा रुग्णाच्या नातेवाईकांच्या अनुपस्थितीत तपासणी करणे अत्यावश्यक असताना तसे केले नाही.
दोन्ही व्यक्ती अनुपस्थित असल्यास स्त्री कर्मचारी उपस्थित होईपर्यंत तपासणी रोखून धरणे अथवा पुढे ढकलणे अपेक्षित होते. तपासणीवेळी रुग्ण महिलेची मैत्रिण उपस्थित असताना तिला तपासणीवेळी उपस्थित राहण्यास सांगण्यात आले नाही. त्या रुग्ण महिलेला मासिक पाळीच्या त्रासामुळे पोटदुखी होत असताना तीला स्त्रीरोग तज्ज्ञाकडे तपासणी करण्याचा सल्ला देणे आवश्यक होते. परंतु, तसे न करता डॉ. निखाते यांनी त्या रुग्ण महिलेची आंतरीक तपासणी केली. हि बाब आक्षेपार्ह असुन लैंगिक गैरवर्तन असल्याचे त्या रुग्ण महिलेने आरोग्य विभागाकडे केलेल्या तक्रारीवरील चौकशी अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे.
यावर डॉ. निखाते यांनी, त्या रुग्ण महिलेची तपासणी करतेवेळी ओपीडीचा दरवाजा उघडा ठेवून कोणताही आक्षेपार्ह गैरवर्तन केले नसल्याचा खुलासा केला आहे. मात्र प्राप्त अहवालानुसार आयुक्तांनी हे प्रकरण विशाखा समितीपुढे ठेवले असता दोन्ही प्रकरणांची सुनावणी १७ डिसेंबर रोजी घेण्यात आली. त्यात देव याने समितीला माफीनामा सादर करुन यापुढे असे होणार नसल्याची हमी दिल्याने त्याचे प्रकरण मिटविण्यात आले. तर डॉ. निखातेंच्या प्रकरणात सुनावणीवेळी तक्रारदार महिला अनुपस्थित राहिल्याने सुनावणी पुढे ढकलण्यात आली.