भिवंडी - गोवर रुग्णांचा हॉटस्पॉट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भिवंडी शहरात पुन्हा एकदा गोवर बाधित रुग्णांचा प्रकोप वाढला असून तब्बल ७९३ संशयीत रुग्ण हे गोवर बाधित आढळून आल्या त्याची माहिती भिवंडी महानगरपालिका आरोग्य विभागाने मंगळवारी दिली आहे.
भिवंडी महानगरपालिका क्षेत्रामधील गोवर बाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून ९२६ गोवर बाधितांचे नमुने तपासले असता त्यामध्ये ७९३ रुग्णांचे नमुने संशयित आढळून आले असून लागण झालेल्या रुग्णांची संख्या ४८ वर पोहचली असून आता पर्यंत शहरात एकूण तीन बालकांचा मृत्यू झाला आहे.
रुग्णांच्या रक्ताचे नमुने घेऊन तपासणी करीता हाफकीन रिसर्च इन्स्टीटयूट, परेल, मुंबई येथे पाठविण्यात आले होते.या अहवालात ४८ रुग्ण हे गोवर रुबेला बाधीत असल्याचे अहवाल प्राप्त झाले आहेत. तर या अहवालाअंतर्गत फक्त १४ रुग्णांचे गोवर रुबला लसीकरण झालेले आहे व इतर रुग्णांचे गोवर रुचेला लसीकरण झालेले नाही ही धक्कादायक बाब समोर आली आहे. रुग्ण बाधित कार्यक्षेत्रामध्ये आरोग्य कर्मचारी घरोघरी जाऊन सर्वेक्षण करून संशयीत रुग्णांना व्हीटामिन ए चा पहिला डोस व २४ तासानंतर दूसरा डोस दिला जात आहे तसेच नऊ महिने ते पाच वर्ष वयोगटातील ज्या लाभार्थ्यांनी गोवर रुबेलाचा डोस घेतलेला नाही अशा लाभार्थ्यांना गोवर रुबेला डोस दिला जात असल्याची माहिती मनपा आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे.