सुरेश लोखंडे, लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : जिल्ह्यातील भात पिकावर खोड कीडा, पाने गुंढाळणारी आळी आदी पीक रोगांचा प्रादुर्भाव मोठ्याप्रमाणात झाला आहे. यावर मात करून हा रोग संपवण्यासाठी भाताच्या शेतात ठिकठिकाणी पक्षी गोळा करण्यासाठी पक्षी थांबे उभारले जात आहे. या थांब्यांवर पक्षांना एकत्र आणून भातावरील आळी, कीड आदींकडे त्यांचे लक्ष वेधून घेतले जात आहे. त्यांच्याकडून या आळी, कीडे फस्त करण्याच्या उपाययोजनेतून या पीक रोगाला नियंत्रणात आणण्याचे काम जिल्ह्याच्या दौर्यावरील कृषी विज्ञान पथकाच्या तज्ञांनी जिल्ह्यात हाती घेतल्याचे वास्तव समोर आले आहे.
या पीक रोगांच्या खोड कीड्यासह आळीचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी जिल्ह्यातील मुरबाड, शहापूर, भिवंडी आदी तालुक्यांत पालघरच्या डहाणू येथील कोसबाड कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख डाँ. उत्तम सहाणे यांच्यासह कोकण विभगीय कृषी सहसंचालक अंकुश माने, उपसंचालक दीपक कुंटे आदीं तज्ञांच्या नियंत्रणातील पथक सध्या थेट शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन कीड रोगाची तीव्रता अभ्यासत आहेत. यामध्ये पाणी साचणार्या ठिकाणी व जेथे सतत पाणी वाहते अशा शेतात पाने गुंडळणारी अळी व सुरळीतील अळी व किडी मोठ्या प्रमाणात आढळून येत आहे. त्यावर वेळीच मात करण्यासाठी एका एकरात जवळजवळ दहा पक्षी थांबे उभारण्याचे सूचवले जात आहे. चार ते पाच फूट उंच उभारलेल्या थांबेंवर पक्षांचा थवा बसवण्याचे नियोजन आहे. या बसलेल्या पक्षांकडून भातावरील कीड, आळी खाण्यात येते. आळी फस्त करण्याच्या या उपाययोजनेचे नियोजन सध्या हाती घेतले आहे.
शेतकऱ्यांच्या शेतात प्रत्यक्ष जाऊन पीक रोगाच्या उपाययोजनांचे प्रात्यक्षिके हे तज्ञ पथका शेतकऱ्यांकडून करुन घेत आहे. उपाययोजनांची जाणीव करून दिली जात आहे. रक्षकांच्या या थव्यांसह कलोरो पायारिफोस २० टक्के हे कीटक नाशक २० मिली प्रती १० लिटर पाण्यातून फवारण्याचे काम शेतकऱ्यांकडून करुन घेतले जात आहे. याशिवाय करपा रोगाची लक्षणे दिसत असल्यास कॉपर ऑक्सी क्लोराईड २५ ग्रॅम किंवा कार्बन डेझिम १० ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यातून फवारण्यचे सूचवले जात आहे. यासाठी या कृषी विज्ञान तज्ञांचे पथक शहापूरच्या नडगांव येथील विठ्ठल भोईर, मुंग्यांच्या विठ्ठल विशे, बंडू शेलवले, शिवराम ठाकरे, यांच्या बुरसुंगे, इंदे, नेवाळे, शिरोळ आदीं गावतील शेतांसह मुरबाड, भिवंडी,कल्याण तालुक्यातील शेतीत जाऊन पहाणीस उपाययोजना हाती घेत आहेत.