डोंबिवली : अहमदाबाद-मुंबई बुलेट ट्रेन प्रकल्पाकरिता आदिवासींची ८० टक्के जमीन संपादित केली जाणार असून राज्यातील महाविकास आघाडीच्या सरकारने या प्रकल्पाचा पुनर्विचार करण्याच्या केलेल्या घोषणेचे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या व पर्यावरणवादी चळवळीच्या अध्वर्यू मेधा पाटकर यांनी रविवारी स्वागत केले.
आगरी युथ फोरमने आयोजित केलेल्या आगरी महोत्सवानिमित्त आयोजित परिसंवादात सहभाग घेण्याकरिता पाटकर उपस्थित राहिल्या होत्या. त्यावेळी पत्रकारांशी अनौपचारिक गप्पांमध्ये त्यांनी वरील मत व्यक्त केले. आगरी युथ फोरमचे गुलाब वझे हे यावेळी उपस्थित होते.पाटकर म्हणाल्या की, बुलेट ट्रेनची गरज आहे का, हाच मुळात प्रश्न आहे. या प्रकल्पाकरिता ज्या आदिवासींची जमीन संपादित केली जाणार आहे, त्यांचे पुनर्वसन कसे केले जाणार, हा महत्त्वाचा मुद्दा आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्यातील सरकारचा या प्र्रकल्पाच्या फेरविचाराचा निर्णय दिलासादायक आहे.
सध्या देशात सुरू असलेल्या गांधी विरुद्ध सावरकर वादाबद्दल विचारले असता पाटकर म्हणाल्या की, गांधी विरुद्ध सावरकर, गांधी विरुद्ध भगतसिंग, गांधी विरुद्ध आंबेडकर या विषयांवरील वादांपेक्षा देशाच्या हिताकरिता गांधीवादी अर्थव्यवस्था हवी की मोदीवादी अर्थव्यवस्था हवी, हा महत्त्वाचा मुद्दा आहे. सर्वच राजकीय पक्षांनी शोषितांच्या, प्रकल्पबाधितांच्या प्रश्नांवर त्यांच्या बाजूने उभे राहणे गरजेचे आहे. हैदराबाद येथील बलात्काराच्या घटनेकडे लक्ष वेधले असता त्या म्हणाल्या की, स्त्री ही अबला नाही. मात्र, अशा अत्याचारांच्या प्रकरणांत तिचा प्रतिकार हिंस्र असू शकत नाही. स्त्रीने हिंसक प्रतिकार करायचे ठरवले तर पुरुषप्रधान व्यवस्थाच काय समाजच शिल्लक राहणार नाही. जन्मदात्या आईला लक्ष्य करण्यापर्यंत काहींची मजल गेली आहे. अशा हिंसेला हिंसेने नव्हे तर अहिंसात्मक, सत्याग्रही पद्धतीनेच उत्तर द्यायला हवे, असे सांगत हैदराबाद एन्काऊंटरचा निषेध केला.