ठाणे - लॉकडाउन मध्ये गरिबांवर, श्रमिकांवर जो अन्यायाचा मोठा वरवंटा फिरलेला आहे, त्याचा त्रास कोरोंना संकटापेक्षाही जास्त भयानक आहे. त्याचे मूळ कारण विषमता आणि गरिबांच्या सोयी सुविधांबद्दल असलेली प्रचंड उदासीनता हेच आहे. एकलव्य विद्यार्थ्यांनी समतेचे पाइक बनून या देशाच्या परिस्थितीला सुधारण्याचे आव्हान पेलले पाहिजे. समतेची ज्योत बनून समाजाला प्रकाशाकडे नेण्यासाठी झटले पाहिजे, अशा शब्दात जेष्ठ सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांनी युवकांना प्रोत्साहित केले.
समता विचार प्रसारक संस्थेच्या २८ व्या वर्धापन दिनानिमित्ता आयोजित केलेल्या झूम मेळाव्यात त्या बोलत होत्या. कोरोना काळात सतत संस्थेच्या वतीने मदत कार्यात अग्रेसर असणारा कोरोना योद्धा आणि संस्थेचा युवा कार्यकर्ता अजय भोसले यांनी या मेळाव्याचे संयोजन केले होते. संस्थेच्या जेष्ठ सहकारी आणि संस्थापक लतिका सु. मो. अध्यक्षस्थानी होत्या. "आपले स्व-आरोग्य सांभाळून आपल्या परिसरातील आरोग्य रक्षणापासून पर्यावरण रक्षणापर्यन्त जागृत राहून सर्व समाजाला जोडून घेवून समाज परिवर्तनाचे काम पुढे नेणे, ही आजच्या युवकांची जबाबदारी आहे. आज राजकारण्यांची मूल्यहीनता, अर्थकारणात मोठ्या पुंजीपतींचे राज्य, निवडणुकीतील भ्रष्टाचार, शिक्षणातील विषमता, तथाकथित विकासासाठी पर्यावरणाची दुर्दशा अशासारख्या अनेक गंभीर मुद्द्यांपैकी कुठल्या मुद्द्यावर काम करायचे हे ठरवून त्याचा पद्धतशीर पाठपुरावा केलात. त्याकामी समाजातील अन्य संवेदनशील घटकाला सोबत घेतले तर समाज तुम्हाला पुरस्कृत केल्याशिवाय राहणार नाही!”, असे मेधास पाटकर पुढे म्हणाल्या. जेष्ठ समाजवादी विचारवंत गजानन खातू यांनी संस्थेच्या ठाण्यातील कामाची प्रशंसा करत सांगितले की,”देशातील अनेक जटील प्रश्नांकडे नकारात्मक दृष्टीकोनातून न बघता ती सकारात्मक प्रक्रिया कशी होईल याकडे लक्ष दिलं पाहिजे. आज समाजाच्या कुठल्याही प्रश्नावर तोडगा काढताना त्याचा विचार गुंतवणूक, भांडवल वा पैशाच्या अंगाने केला जातो, त्या ऐवजी आपलं मनुष्य बळ वा मानवी भांडवलाला सकारात्मक वळण दिलं तर किती चांगलं काम होऊ शकतं, याचा समता विचार प्रसारक संस्था हे उत्तम उदाहरण आहे.
डिजिटल शिक्षण, रोजगारावर कामाची गरज
जेष्ठ कवियत्री, लेखिका निरजा यांनी संस्थेचे अभिनंदन करतांना सांगितले, ”वंचित युवकांना त्यांचं स्वत्व सापडण्याचा क्षण ही संस्था देते. त्यांची सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय जडणघडण करण्याचा प्रयत्न सतत २८ वर्षे करणे, हे अतिशय कौतुकास्पद आहे.” वंचितांचा रंगमंचचे प्रणेते दिवंगत जेष्ठ साहित्यिक रत्नाकर मतकरी यांच्या पत्नी प्रतिभा मतकरी आणि त्यांच्या कन्या प्रसिद्ध अभिनेत्री आणि साहित्यिक सुप्रिया विनोद यांनी संस्थेला शुभेच्छा देऊन संगितले की, रत्नाकर मतकरी यांकडे वंचितांचा रंगमंच अर्थात नाट्य जल्लोषचे कार्य पुढे नेण्यासाठी त्या सर्वतोप्रकारे मदत करतील. सर्वांचे स्वागत करून प्रस्तावना करताना संस्थेचे संस्थापक विश्वस्त आणि साने गुरुजी राष्ट्रीय स्मारकाचे नव निर्वाचित अध्यक्ष, जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते संजय मंगला गोपाळ यांनी संस्थेच्या स्थापनेचे उद्दीष्ट तसेच संस्थेची आजपर्यंतची वाटचाल याबद्दल माहिती दिली. जन आंदोलनांचा राष्ट्रीय समन्वयाच्या जेष्ठ कार्यकर्त्या सुनिती सु. र. या वेळी बोलताना म्हणल्या, "कोरोना बरोबर जगणं ही नवीन जगाची उभारणी करण्यासाठी उत्तम संधी आहे. औद्योगीकरण आणि जागतिकीकरणाच्या रेट्याने गावांकडुन शहराकडे लोकांचा ओघ सुरू झाला होता. कोरोनाच्या संकटाने शहरांकडून परत गावाकडे लोकांचे पाय वळायला लागले आहेत. ही संधी मानून स्वयंपूर्ण गावे ही मोठ्या महानगरांना पर्याय ठरवण्याची प्रक्रिया आता सुरू करायला योग्य वेळ आहे. त्यासाठी युवकांनी पुढाकार घेणे जरूरी आहे.” संस्थेच्या संस्थापक निशा शिरूरकर यांनी संस्था स्थापन करतानाच्या वेळेचे वातावरण, त्यामागचा विचार आणि त्यासाठी केलेले प्रयत्न यांची माहिती दिली. संस्थेचे विश्वस्त जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते जगदीश खैरालिया यांनी, लॉकडाऊनच्या काळात श्रमिकांच्या आणि युवकांच्या रोजगाराचे, डिजिटल शिक्षणाच्या नावाने येत असलेल्या शैक्षणिक विषमतेचे, महिलांवरील कौटुंबिक अत्याचाराचे अनेक प्रश्न नव्याने, नवीन स्वरुपात पुढे येत आहेत हे नमूद केले आणि समता संस्थेने जन आंदोलनाचा राष्ट्रीय समन्वयाशी जोडून घेत, हे विषय कोरोंनाच्या काळातही निर्भयपणे हाती घेतले पाहिजेत,असे आवर्जून संगितले. संस्थेच्या अध्यक्ष मनीषा जोशी यांच्या श्रीवर्धन येथील घराचे आणि एकंदरीत त्या गावाचे आणि परिसराचे ‘निसर्ग’ वादळाने किती भयंकर नुकसान केले त्या विध्वंसाच्या स्वतः पाहिलेल्या स्वरूपाचे वर्णन त्यांनी केले. संस्थेच्या कार्यकर्त्या मीनल उत्तुरकर यांनी वंचितांचा रंगमंच म्हणजेच नाट्यजल्लोष याच्या पुढील कार्यक्रमांबद्दल माहिती दिली. संथेच्या कार्यवाह हर्षलता कदम यांनी संस्थेच्या वर्षभरात झालेल्या उपक्रमांची, कार्यक्रमांची माहिती दिली.
एकलव्य युवकांनी सांगितले लॉकडाउन काळातले अनुभव
समता विचार प्रसारक संस्थेच्या एकलव्य विद्यार्थ्यांनी उत्साहाने या मेळाव्यात सहभाग घेतला. संस्थेचे धडाडीचे एकलव्य कार्यकर्ते ज्यांनी गेले 3 महीने संस्थेने कोरोना लॉकडाउन काळात चालवलेल्या मदतीच्या कार्यात तसेच गावाकडे निघालेल्या स्थलांतरित मजुरांना वाहनांची आणि त्यांच्या खाण्यापिण्याची व्यवस्था बघण्यामध्ये स्वतःला वाहून घेतले होते, त्या अजय भोसलेने त्या काळातील अनुभव कथन केले. संस्थेचा माजी सचिव आणि हरहुन्नरी कलाकार संजय निवंगुणे यांनी लॉकडाउन काळात नोकरी करण्याचे आपले अनुभव संगितले. संस्थेची एकलव्य कार्यकर्ती अनुजा लोहार ही हिच्या कुटुंबासह लॉकडाउन लागल्या लागल्याच गावाला निघून गेले. ते सर्व अजून गावीच आहेत. तिथून तिने या मेळाव्यात हजेरी लावून आपले गावकडचे अनुभव सांगितले. एकलव्य कार्यकर्ती दुर्गा माळी हिने संस्थेबरोबर काम केल्याने तिच्या व्यक्तिमत्वात आणि विचारात किती प्रगती झाली, हे नम्रपणे संगितले.संस्थेच्या उपाध्यक्ष आणि जेष्ठ सामाजिक कार्यकर्त्या लतिका सु. मो यांनी समारोप करतांना, एकलव्य सक्षमीकरण योजना आणि नाट्यजल्लोष हे उपक्रम चालवताना आलेले अनुभव कथन केले. शैलेश मोहिले, राजेंद्र बहाळकर आदींनी आपली मनोगते व्यक्त केली. संजय निवंगुणे यांनी उपस्थितांचे आभार मानले. या वेळी प्रा. विनय र.र., प्रा. शिवाजी गायकवाड, दादासाहेब रोंगे, हेमंत जगताप, ऍड. अरविंद तापोळे, शुभांगी आणावकर, अजित पाटील, सुप्रिया कर्णिक, जयंत कुलकर्णी, सिरत सातपुते, उत्तम फलके, उषा मेहता, जीवराज सावंत, वासंती दामले, मंगल व सुरेंद्र दिघे, निलेश मयेकर, दर. प्रेरणा राणे आदी मान्यवर उपस्थित होते. फेसबुक लाईव्ह च्या माध्यमातून प्रक्षेपित केलेल्या या कार्यक्रमात सुमारे ७०० लोकांनी सहभाग नोंदवल्याची माहिती, कार्यक्रमाच्या डिजिटल बाबी सांभाळणाऱ्या प्रकेत ठाकुरने सांगितले.