कल्याण : केडीएमसी हद्दीत सोमवारी कोरोनाचे आठ रुग्ण आढळल्याने एकूण रुग्णांची संख्या १३७ झाली आहे. नव्या रुग्णांमध्ये सात वर्षांची मुलगी, वैद्यकीय, बँक कर्मचारी आणि परिवहनचा बसचालक आहे.कोरोनाबाधिताच्या संपर्कात आल्याने मोहने परिसरातील सात वर्षांची मुलगी तसेच ३२ वर्षांच्या महिलेला संसर्ग झाला आहे. मुंबईतील सरकारी परिवहन सेवेतील ३८ वर्षांचा चालक, डोंबिवली पश्चिमेत राहणारी ४० वर्षांची वैद्यकीय कर्मचारी, कल्याण पूर्वेतील रहिवासी व खाजगी रुग्णालयातील कर्मचारी, कल्याण पश्चिमेतील रहिवासी व मुंबईतील खाजगी बँकेतील काम करणाऱ्या २१ वर्षांच्या तरुणालाही लागण झाली आहे. डोंबिवली पश्चिमेतील रहिवासी असलेल्या १३ वर्षांच्या मुलाला बाधिताच्या संपर्कात आल्याने कोरोना झाला आहे. तसेच डोंबिवली पश्चिमेतील ४८ वर्षांच्या महिलेलाही लागण झाली आहे. आतापर्यंत ४५ जणांना उपचाराअंती घरी सोडले आहे. तर, ८९ जणांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत चार हजार ९९८ जणांना होम क्वारंटाइन केले आहे. तर, ९८ जण इन्स्टिट्युशनल क्वारंटाइनमध्ये आहेत.>कल्याणची सोसायटी झाली कोरोनामुक्तफिजिकल डिस्टन्सिंगचे भान राखल्याने कल्याणमधील एक उच्चभ्रू सोसायटी कोरोनामुक्त झाली आहे. या सोसायटीतील एका डॉक्टरला रुग्णालयात सेवा देताना कोरोनाची लागण झाली. महापालिकेने त्याच्यावर एका रुग्णालयात उपचारकेले. तर, त्यांचा मुलगा व पत्नी यांना भिवंडी बायपास येथील क्वारंटाइन कक्षात ठेवले. सोसायटीतील प्रत्येक सदस्यही क्वारंटाइन झाला. सोसायटीने कोणालाही आत-बाहेर ये-जा करण्यास मज्जाव केला. सर्वांनी नियम पाळल्याने कोणालाही बाधा झाली नाही.डॉक्टरही बरे होऊन रविवारी घरी परतले. त्यांचा मुलगा व पत्नी यांचे वैद्यकीय चाचणीचे अहवालही निगेटिव्ह आले. डॉक्टर व सोसायटीचे केडीएमसी आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी कौतुक केले आहे. या सोसायटीचा आदर्श इतर सोसायट्यांनी घ्यावा व फिजिकल डिस्टन्सिंगचे नियम पाळावे. तसे झाल्यास संपूर्ण शहर कोरोनामुक्त होऊ शकते, असे ते म्हणाले.
वैद्यकीय, बँक कर्मचारी; बसचालक, मुलांना कोरोना
By ऑनलाइन लोकमत | Published: April 28, 2020 1:58 AM