ठाणे : ठाणे महापालिकेच्या रुग्णालयासाठी दीड कोटींच्या व्हेंटिलेटर्सचा ठेका मिळवून देण्याच्या बदल्यामध्ये तब्बल पाच लाखांची लाच स्वीकारणारा ठामपाचा वादग्रस्त वैद्यकीय आरोग्य अधिकारी राजू मुरुडकर याला ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने (एसीबी) गुरुवारी रात्री अटक केली. त्याच्याविरुद्ध रबाले पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.वाढत्या कोरोना रुग्णांसाठी ठामपाला ३० व्हेंटिलेटर्सची तातडीने खरेदी करायची होती. त्यासाठी प्रशासकीय सोपस्कार पूर्ण करून नवी मुंबईच्या एका कंपनीकडून चार लाख ९५ हजारांमध्ये एक असे ३० व्हेंटिलेंटर्स एक कोटी ४८ लाख ५० हजारांमध्ये खरेदी केले जाणार होते. हा ठेका या कंपनीला मिळवून देण्यासाठी या रकमेतील दहा टक्के रक्कमेची म्हणजे १५ लाखांची मागणी मुरुडकर याने या कंपनीच्या प्रतिनिधीकडे दोन दिवसांपूर्वी केली होती. कंपनीने ते मान्य करून आधी पाच लाख आणि नंतर दहा लाख रुपये देण्याचे ठरले. यातील पहिला हप्ता मुरुडकरला त्याच्या ऐरोली येथील एका खासगी रुग्णालयात देण्याचेही ठरले. दरम्यान, कंपनीने याबाबतची तक्रार ठाणे एसीबीकडे केली. याची पडताळणी झाल्यानंतर हाच पाच लाखांचा पहिला हप्ता घेतांना त्याला गुरुवारी (८ एप्रिल रोजी ) ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरीक्षक योगेश देशमुख यांच्या पथकाने ताब्यात घेतले. त्याच्याकडून लाचेची रक्कमही हस्तगत केली आहे. त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक डॉ. पंजाब उगले यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.
पाच लाखांची लाच घेणारा वैद्यकीय आरोग्य अधिकारी एसीबीच्या जाळ्यात
By ऑनलाइन लोकमत | Published: April 09, 2021 4:28 AM