ठाणे : महाड येथे झालेल्या पूरस्थितीनंतर साथीचे आजार उद्भवू नयेत किंवा आजारी व्यक्तींची तातडीची तपासणी होऊन औषधोपचार व्हावेत, यासाठी ठाणे महापालिकेच्या वतीने महाड, पोलादपूर, चिपळूण येथे आरोग्य पथके रवाना करण्यात आली आहेत. या पथकांनी महाड येथे ४०० हून अधिक नागरिकांची तपासणी केली. मंगळवारी या पथकाला ठाण्याचे महापौर नरेश म्हस्के यांनी भेट देऊन कामकाजाचा आढावा घेतला. यावेळी ठाणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संजय हेरवाडे, उपायुक्त अशोक बुरपल्ले हेही उपस्थित होते.
महाड तळीये येथे अतिवृष्टीमुळे भयावह स्थिती निर्माण झाली आहे. पूरस्थितीनंतर साथीचे आजार पसरण्याची दाट शक्यता असते. यासाठी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशान्वये महापौर म्हस्के व आयुक्त डॉ.विपिन शर्मा यांच्या सूचनेनुसार ठाणे महापालिकेची वैद्यकीय पथके आवश्यक औषधसाठा व वैद्यकीय साधनसामुग्रीसह रवाना करण्यात आली आहेत. महाड नगरपरिषदेच्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर भवनात गेल्या तीन दिवसांपासून तपासणी सुरू करण्यात आली आहे.
या शिबिरामध्ये कोविड, साथरोग आणि ताप, मलेरिया, डेंग्यू, लेप्टोस्पायरोसीस आदी आजारांची तपासणी करून बाधित व्यक्तींना आवश्यक ती औषधे मोफत देण्यात येत आहेत. महाड व चिपळूण येथे २५ जणांचे पथक कार्यरत आहे.