- नितिन पंडीत
भिवंडी: कोरोना संकट नंतर आता हळूहळू सर्वत्र नाट्य रसिकांसाठी नाट्यगृह उघडले जात असून त्यात विविध नाट्य कार्यक्रमांचे आयोजन देखील करण्यात येत आहेत नुकताच ठाणे व कल्याण येथील नाट्यगृह रसिकांसाठी उघडण्यात आली आहेत . त्यामुळे येथील नाट्य रसिकांनी आनंद व्यक्त केला . मात्र भिवंडीतील नाट्य रसिकांच्या नशिबी सध्या निराशा पसरली आहे . भिवंडी परिसरातील नाट्य रसिकांच्या करमणुकीसाठी महापालिकेच्या कार्यकक्षेत असलेले एकमेव स्व. मीनाताई ठाकरे रंगायतन सध्या नादुरुस्त असल्या कारणाने बंद करण्यात आले आहे .
तब्बल तीन वर्षांपासून हे नाट्यगृह बंद असल्याने येथील नाट्य रसिकांत तीव्र नाराजी पसरली असून, या रंगायतनाच्या झालेल्या दुरावस्थेकडे पालिका प्रशासनाने लक्ष द्यावे अशी मागणी वारंवार होत आहे, मात्र गेंड्याची कातडी परिधान केलेल्या भिवंडी महापालिका प्रशासनास त्याची काहीएक चिंता वाटत नसल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे . त्यामुळे मनपाच्या दुर्लक्षित कारभारामुळेच या नाट्यगृहाची अशी दयनीय अवस्था झाली असल्याची खंत नागरिकांसह नाट्य रसिक व्यक्त करीत आहेत . विशेष म्हणजे कोरोना संकटाच्या आधी या नाट्यगृहाच्या दुरुस्तीसाठी ठाणे जिल्ह्याचे पालक मान्यता एकनाथ शिंदे यांनी दहा कोटींचा निधी मंजूर केला होता . मात्र निधी मंजूर होऊनही या नाट्यगृहाच्या दुरुस्तीला मुहूर्त मिळत नसल्याने नाट्य रसिकांमध्ये कमालीचे नाराजी पसरली आहे.
भिवंडी महापालिकेने नागरिकांच्या करमणुकीसाठी सन १९९५ - ९६ साली भव्य असे स्व. मीनाताई ठाकरे रंगायतन बांधण्यात आले आहे. विशेष म्हणजे या काळात युतीशासनात शिवसेनेचे पहिल्यांदाच सरकार स्थापन झाले होते. त्यावेळी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी शिवसेनेचे जैष्ठ नेते मनोहर जोशी हे तत्कालीन मुख्यमंत्री होते विशेष म्हणजे याच कालावधीत भिवंडी महापालिकेत त्यावेळच्या नगरपरिषदेत देखील शिवसेनेची सत्ता होती. दरम्यानच्या काळात स्व मीनाताई ठाकरे यांचे निधन झाले होते , त्यामुळे या नाट्यगृहाला स्व मीनाताई ठाकरे रंगायतन हे नाव देण्यात आले व महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्या हस्ते या नाट्यगृहाचे उदघाटन करण्यात आले होते.
विशेष म्हणजे रंगायतनाला तमाम शिवसैनिकांच्या माँसाहेबांचे नाव दिल्याने हे रंगायतन शिवसैनिकांसाठी श्रद्धास्थान झाले होते. आता सुमारे २३ - २४ वर्षांच्या कालावधीत या रंगायतनाची दुरावस्था झाली असून एकेकाळी तमाम शिवसैनिकांचे श्रद्धास्थान असलेले हे मीनाताई ठाकरे रंगायतन सध्या बंद पडले आहे . शहरासह ग्रामीण भागातील नाट्य रसिकांचा त्यामुळे हिरमूस झाला असून भिवंडीतील नागरिकांची मोठ्या प्रमाणात सांस्कृतिक अडचण निर्माण झाली आहे. त्याचबरोबर नाट्यगृहाच्या कमतरतेमुळे येथील होतकरू व नवकलाकारांच्या कलागुणांना देखील वाव मिळत नसल्याने या नवकलाकारांची मोठ्या प्रमाणात सांस्कृतिक अडचण निर्माण झाली आहे . तसेच नाटकाचे प्रयोग होत नसल्याने येथील नाट्य रसिकांना नाटक व इतर मनोरंजनाचे कार्यक्रम पाहण्यासाठी कल्याण , ठाणे, मुंबई या ठीकाणी जावे लागत आहे.
नाट्यगृहाच्या दुरुस्थीसाठी महापालिकेने आतापर्यंत लाखो रुपयांचा निधी खर्च केला आहे मात्र तरी या नाट्यगृहाची दुरावस्था झाल्याने हा नाट्यगृह बंद आहे. विशेष म्हणजे पालक मंत्र्यांनी दुरुस्तीसाठी दहा कोटींचा निधी मंजूर करूनही या नाट्यगृहाच्या कमला अजूनही सुरुवात झाली नाही हीच मोठी शोकांतिका आहे . ६ जानेवारी रोजी स्व मीनाताई ठाकरे यांची जयंती साजरी होणार असून राज्यात शिवसेनेचे ठाकरे सरकार असतांना मासाहेबांचा जयंती आधी तरी तरी या वास्तूच्या दुरुस्तीला सुरुवात होईल का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
दरम्यान नाट्यगृहाच्या दुरुस्तीसाठी दहा कोटींचा निधी मंजूर झाला आहे मात्र त्याचे हस्तांतरण अजूनही भिवंडी महापालिकेकडे झालेले नाही त्यामुळे नाट्यगृहाचे काम बंद आहे , या निधीसाठी शासकीय स्तरावर पत्रव्यवहार व वारंवार चौकशी देखील सुरु आहे निधी मनपाकडे हस्तांतरित झाल्यास त्वरित या नाट्यगृहाचे दुरुस्ती काम सुरु करण्यात येईल अशी प्रतिक्रिया भिवंडी मनपाचे आयुक्त डॉ पंकज आशिया यांनी दिली आहे .