मीरा रोड : मीरा-भार्इंदरच्या नव्या महापौर आणि उपमहापौरपदासाठी सोमवारी, २८ आॅगस्टला पालिका मुख्यालयात निवडणूक होणार आहे. त्यासाठी गुरु वारी नगरसचिवांकडे अर्ज भरायचे आहेत. भाजपाकडे स्पष्ट बहुमत असल्याने ही निवडणूक केवळ औपचारिकता ठरणार आहे. आमदार नरेंद्र मेहता यांच्या भावजय असलेल्या भाजपाच्या डिम्पल मेहता या महापौरपदाच्या मुख्य दावेदार असून त्यांची निवड निश्चित मानली जाते.उपमहापौरपदासाठी माजी उपमहापौर चंद्रकांत वैती, प्रशांत दळवी, रवी व्यास यांच्या नावांची चर्चा आहे. त्या पदासाठी अनुभवी व्यक्ती दिली जाते, की मेहता यांच्या निष्ठावंताला संधी दिली जाईल, हे दुपारी स्पष्ट होईल.सध्या मेहतांचे पालिकेसह स्थानिक भाजपावर एकहाती वर्चस्व आहे. यंदाचे महापौरपद हे इतर मागासवर्गीय महिलेसाठी आहे आणि ज्या पद्धतीने तिकीटवाटप झाले, ते पाहता त्यांची भावजय डिम्पल याच या पदाच्या एकमेव दावेदार म्हणून पुढे होत्या. डिम्पल मेहता यांचे नाव निश्चित असले, तरी त्यांना फारसे मराठी येत नाही. महासभेचे कामकाज चालवणेही आवश्यक आहे. विरोधकांना नियंत्रणात ठेवण्याची कसरत त्यांना पार पाडावी लागणार आहे. त्यामुळे महापौरपद घरात ठेवतानाच उपमहापौरपदासाठी मात्र अनुभवी नगरसेवक द्यावा लागेल.दरम्यान, खासदार कपील पाटील यांच्या नातलग वंदना मंगेश पाटीलही महापौरपदासाठी प्रयत्नशील असल्याचे समजते.‘महापौर मराठी हवा’भार्इंदर : मीरा-भार्इंदरच्या महापौरपदी मराठी व्यक्ती हवी, अशी मागणी मराठी एकीकरण समितीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. यंदा ९५ पैकी ४३ अमराठी उमेदवार निवडून आले आहेत. त्यामुळे समितीचे अध्यक्ष गोवर्धन देशमुख यांनी मराठी टक्का जपण्यासाठी मराठी उमेदवाराची मागणी केली आहे.विरोधकांचाही उमेदवार?भाजपाकडे स्पष्ट बहुमत असले तरी महापौर व उपमहापौर पदाची निवडणूक बिनविरोध होऊ देण्याऐवजी शिवसेना किंवा काँग्रेस उमेदवार देण्याची शक्यता आहे.हे दोन्ही पक्ष वेगवेगळे उमेदवार देतात की एकेका पदासाठी लढत देतात, ते समजेल.
मीरा-भार्इंदरमध्ये आज महापौरपदासाठी अर्ज, डिम्पल यांची निवड निश्चित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2017 3:41 AM