लोकमत न्यूज नेटवर्कभार्इंदर : मीरा-भार्इंदर शहरातील बहुतांश भाग पहिल्याच मुसळधार पावसामुळे जलमय झाला. या भागातील नागरिकांना दिलासा देण्यासह समस्या जाणून घेण्यासाठी महापौर गीता जैन व आयुक्त डॉ. नरेश गीते, शहर अभियंता शिवाजी बारकुंड यांच्यासह पालिकेचे इतर अधिकारी व नगरसेवक रस्त्यावर उतरले होते. झाडे व भिंत कोसळण्यासह शॉर्टसर्कीटच्या घटना घडल्या. दोन वाहनांचे नुकसान झाले. शहरातील बहुतांश भागात पूर्वी योग्य नियोजनाअभावी बांधण्यात आलेल्या इमारती रस्त्याच्या भरावामुळे खाली गेल्याने तेथे पाणी तुंबते. यंदा नालेसफाईही उशिराने सुरू झाल्याने ती वेळेत पूर्ण झाली नाही. तसेच सफाई योग्य न झाल्यानेच सखल भाग जलमय झाल्याचा आरोप नागरीकांनी केला आहे. या भागात साचलेल्या पाण्याचा उपसा करण्यासाठी पालिकेने सक्शन पंप बसवून त्याद्वारे गटारे व नाल्यांत पाणी सोडले जात होते. तसेच अनेक इमारतीच्या आवारातही पाणी शिरल्याने तळमजल्यावरील घरांत पाणी आले. जलमय भागांची महापौर, आयुक्तांसह पालिकेचे अधिकारी, नगरसेवक ध्रुवकिशोर पाटील, कॅटलिन परेरा, डॉ. दिनेश जैन यांनी पाहणी केली. भार्इंदर पूर्वेकडील खारीगाव, तलावरोड व पश्चिमेकडील गीतानगरमध्ये झाडे कोसळण्याच्या घटना घडल्या. त्यापैकी दोन ठिकाणी झाडे वाहनांवर पडल्याने त्यांचे नुकसान झाले. तसेच मॅक्सस मॉल रोडवर असलेल्या जोशी रूग्णालयाच्या भिंतीचा काही भाग जवळच्या आदित्य अपार्टमेंटमध्ये कोसळला. पूर्वेकडील जेसलपार्क परिसरात असलेल्या जनता सोसायटी इमारतीत पाणी साचल्याने तेथील मीटरबॉक्सला पाण्याचा स्पर्श होऊन शॉर्टसर्कीट झाल्याचा घटना घडली. शहर जलमय झाल्याने जनजीवन विस्कळीत झाले होते. दुपारनंतर पावसाचा जोर ओसरला.
पहिल्याच पावसात मीरा-भार्इंदर जलमय
By admin | Published: June 26, 2017 1:27 AM