मीरा भाईंदर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारां सोबत भाजपा आणि अजीत पवारांच्या निषेधार्थ घोषणाबाजी
By ऑनलाइन लोकमत | Published: November 23, 2019 07:35 PM2019-11-23T19:35:46+5:302019-11-23T19:35:54+5:30
मीरा भाईंदर मधील राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रत्येक कार्यकर्ता आमचे झुंझार पक्षाध्यक्ष शरद पवारांसोबत असल्याचे सांगत राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी भाजपा आणि अजित पवारांच्या निषेधार्थ जोरदार घोषणाबाजी केली.
मीरारोड: मीरा भाईंदर मधील राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रत्येक कार्यकर्ता आमचे झुंझार पक्षाध्यक्ष शरद पवारांसोबत असल्याचे सांगत राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी भाजपा आणि अजित पवारांच्या निषेधार्थ जोरदार घोषणाबाजी केली.
राज्यातील विधानसभा निवडणुकीत शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेस उभारी देत सत्तेच्या जवळ आणले असताना आज शनिवारी सकाळी देवेंद्र फडणवीस यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवारांनी राजभवनवर शपथ घेतल्याने खळबळ उडाली आहे.
अजित पवार व देवेंद्र फडणवीससह भाजपाचा निषेध राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी भाईंदरच्या स्वातंत्र्यवीर सावरकर चौका जवळ केले. भाजपाने सत्ते साठी फोडाफोडी चे घाणेरडे राजकारण करतानाच त्यांच्या सह राज्यपालांनी देखील देशाच्या संविधान आणि लोकशाहीला काळिमा फासल्याचा आरोप जिल्हाध्यक्ष संतोष पेंडुरकर यांनी केला.
आम्ही शरद पवारांसोबतच कायम राहणार असून त्यांना या वयात दगाबाजीचा खंजीर खुपसणाऱ्या अजित पवार व देवेंद्र फडणवीससह भाजपाला महाराष्ट्र माफ करणार नाही असा संताप कार्यकर्त्यांनी व्यक्त केला. या आंदोलनात युवक जिल्हाध्यक्ष साजिद पटेल, जक्की पटेल, तारिक जमीनदार, सुरेश सकपाळ, सुप्रिया माईणकर, आशा शिंदे, अनिल साबळे, अनंत म्हात्रे, बाबा पठाण, भिलारे, किणी, अमितसिंग ठाकूर प्रकाश मुरुकते, शीतल गायकवाड, सुमित्रा करकरे, सुनील उपाध्याय, सावंत आदी कार्यकर्ते सहभागी झाले होते.