मीरा रोड - मीरा-भाईंदर महापालिकेच्या महापौर व उपमहापौरपदासाठी बुधवारी सकाळी साडेअकरा वाजता निवडणूक होत आहे. भाजपाकडे स्पष्ट बहुमत असले तरी शिवसेना व काँग्रेसचे मिळून ४ नगरसेवक फुटल्याची चर्चा आहे. शिवसेनेने देखील मोर्चेबांधणी चालवली आहे. त्यामुळे भाजपाचे नेते रवींद्र चव्हाण यांनी शहरात तळ ठोकला असून, एकूणच चुरस व तणाव पाहता पोलिसांनी मोठा बंदोबस्त ठेवला आहे.महापौरपद अनुसूचित जातीसाठी राखीव असल्याने भाजपाकडून ज्योत्स्ना हसनाळे तर शिवसेनेकडून अनंत शिर्के यांच्यात लढत होणार आहे. उपमहापौरपदासाठी भाजपाकडून हसमुख गेहलोत व मदन सिंह या दोघांनी अर्ज भरल्याने एकास माघार घ्यावी लागणार आहे. काँग्रेसकडून मर्लिन डिसा उपमहापौरपदाच्या उमेदवार आहेत. भाजपाकडे ६१, शिवसेनेकडे २२ व काँग्रेस आघाडीकडे १२ नगरसेवक आहेत. भाजपाकडे स्पष्ट बहुमत असले तरी भाजपाच्या गळास सेनेच्या दोन व काँग्रेसचे दोन असे महाविकास आघाडीचे चार नगरसेवक लागले असल्याची चर्चा आहे.शिवसेनेने काँग्रेस सोबत मिळून महापालिकेवर महाविकास आघाडीचा महापौर व उपमहापौर बनवण्याचा चंग बांधला असला तरी त्यांना त्यांचेच नगरसेवक सांभाळता आलेले नाहीत. सेनेच्या नगरसेवकांना लोणावळा येथे ठेवले होते. तर भाजपामध्ये देखील नाराजी व बंडाळीची धास्ती असल्याने नगरसेवकांना आधी गोवा मग सी एन रॉक येथे ठेवण्यात आले. त्यांचा संपर्क कोणाशी होऊ नये म्हणून मोबाईल देखील काढले आहेत. नगरसेवकांचे मोबाईल ताब्यात घेण्यात आल्याचे समजते.भाजपाचे माजी आमदार नरेंद्र मेहता समर्थक उमेदवारांचा पत्ता कापला गेला असतानच भाजपा नगरसेविका नीला सोन्स यांनी मेहतां विरोधात वरिष्ठ पोलीस अधिकारायांना तक्रार केल्याने खळबळ उडाली आहे. मेहतांचे व्हिडिओ व्हायरल झाले आहेत. याची कुणकुण आधीच लागल्याने मेहतांनी सोमवारी सायंकाळीच भाजपा व राजकारण सोडत असल्याचे जाहिर केले होते. त्यामुळे भाजपात खळबळ उडाली असुन मेहतांचे समर्थक व भाजपा नगरसेवक काय भुमिका घेतात हे देखील स्पष्ट होईल. एकुणच या निवडणुकी तील चुरस व तणाव पाहता पोलीसांनी मोठा बंदोबस्त ठेवला आहे.
मीरा-भाईंदर महापौर व उपमहापौर निवडणूक बुधवारी, महाविकास आघाडीत चुरस
By ऑनलाइन लोकमत | Published: February 25, 2020 9:28 PM