मीरारोड - राज्यातील अनेक भाजपा जिल्हाध्यक्षांच्या नियुक्त्या प्रदेश नेतृत्वाने केल्या असून मीरा भाईंदर जिल्हाध्यक्ष पदी माजी आमदार नरेंद्र मेहता समर्थक किशोर शर्मा यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यामुळे मेहता गटात आनंदाचे वातावरण असून माजी जिल्हाध्यक्ष ऍड. रवी व्यास व आमदार गीता जैन गटाला मेहतांनी दिलेला धक्का मानला जात आहे.
मेहता गटाचा विरोध असून देखील व्यास यांनी पक्ष बांधणी व पक्षाचे विविध कार्यक्रम सातत्याने राबवले होते. व्यास यांची नुकतीच मीरा भाईंदर विधानसभा निवडणूक प्रमुख पदी पक्षाने नियुक्ती केली होती. तर जिल्हाध्यक्ष पदासाठी मेहता समर्थक माजी उपमहापौर हसमुख गेहलोत यांचे नाव तर व्यास गटाकडून माजी सभापती सुरेश खंडेलवाल यांचे नाव चर्चेत होते.
आता प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी राज्यातील अनेक जिल्हाध्यक्षाची यादी जाहीर केली असून त्यात मीरा भाईंदरच्या जिल्हाध्यक्ष पदी मेहता समर्थक किशोर शर्मा यांची नियुक्ती केली आहे. पक्षाने शर्मा यांच्या केलेल्या नियुक्तीचे आमदार गीता जैन व मावळते जिल्हाध्यक्ष रवी व्यास यांनी स्वागत करत शर्मा यांना शुभेच्छा दिल्या आहेत. तर मेहता यांनी, समाज मध्यमवरून शर्मा यांना शुभेच्छा देत पक्ष नेत्यांनी पुन्हा एकदा आमच्या नेतृत्वात शहर भाजपाला गती देण्याचे निश्चित केले आहे असे म्हटले आहे.
नवनियुक्त जिल्हाध्यक्ष शर्मा म्हणाले कि, पक्षाला चांगल्या दिशेला घेऊन जायचे आहे. वरिष्ठ नेते व नरेंद्र मेहतांनी केलेली विकासाची कामे पुढे घेऊन जाऊ. व्यास व मेहता गट बाबत बोलताना ते म्हणाले कि, भाजपात गट नसून सर्वाना सोबत घेऊन काम करणार. तर आमदार गीता जैन बाबत विचारले असता शर्मा म्हणाले कि, पक्षाच्या रचने नुसार काम होत राहणार. शर्मा हे १९८७ साला पासून भाजपात कार्यरत असून त्यांनी अनेक पदांवर काम केले आहे. पालिका निवडणुकीत सुद्धा ते उभे होते मात्र पराभूत झाले होते. शर्मा हे मेहता व व्यास पेक्षा भाजपाचे जुने कार्यकर्ते आहेत. त्यामुळे त्यांचे कामकाज हे विशिष्ट नेत्याचा शिक्का ठरणार कि ते स्वतंत्रपणे काम करणार याकडे कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे.
पक्ष नेतृत्वाच्या निर्णयाला आता मेहतांचा विरोध नाही
शर्मा यांच्या नियुक्ती नंतर मेहतांनी आनंद व्यक्त केला आहे. पूर्वी मेहतांनी पक्ष नेतृत्वाने केलेल्या नियुक्तीला विरोध केला होता. पक्ष नेतृत्वाने भाजपा जिल्हाध्यक्ष पदी हेमंत म्हात्रे यांची फेरनियुक्ती केली तेव्हा मेहता व समर्थकांनी विरोध करत नवे जिल्हा कार्यालय मानत नसल्याची भूमिका घेतली होती. त्यानंतर जून २०२१ मध्ये तत्कालीन प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी जिल्हाध्यक्ष पदी ऍड. रवी व्यास यांची नियुक्ती केली असता त्याला देखील मेहता व समर्थकांनी प्रदेश कार्यालय गाठत विरोध केला होता. अगदी व्यास यांच्या नियुक्तीचा विचार न केल्यास पुढची दिशा ठरवू असा इशारच प्रदेश नेतृत्वाला दिला होता. तेव्हा सुद्धा मेहता व समर्थक जिल्हाध्यक्ष तसेच पक्ष जिल्हा कार्यालय मानत नव्हते.