मीरारोड - मीरा भाईंदर काँग्रेसच्या वतीने शहरात हाथ से हाथ जोडो अभियान सुरु करण्यात आले आहे. शहरात २४ चौकसभा आणि पदयात्रांच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधत भाजपा सरकारचे अपयश मांडले जात असल्याचे जिल्हाध्यक्ष प्रमोद सामंत यांनी सांगितले आहे.
काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा पार पडल्यानंतर प्रदेश अध्यक्ष नाना पटोले व विधिमंडळ नेते बाळासाहेब थोरात यांच्या आदेशानुसार तथा माजी आमदार मुझफ्फर हुसैन यांच्या मार्गदर्शनाखाली काँग्रेसच्या वतीने प्रत्येक ब्लॉक मध्ये २ ते ३ पदयात्रा काढण्यात येत आहेत. भाजपच्या भ्रष्ट कारभाराची पोलखोल २४ चौकसभा घेऊन केली जात आहे. सदर अभियान दोन महिने चालणार असल्याचेच सामंत म्हणाले.
उत्तन, भाईंदर पश्चिम व पूर्व, नया नगर, शांती नगर, हटकेश, मीरा रोड, काशीमिरा आदी ८ ब्लॉक मधील विविध भागात २४ प्रचार फेरी व चौकसभा घेऊन काँग्रेसचे ब्लॉक अध्यक्ष, स्थानिक पदाधिकारी, नगरसेवक पायी फिरून पत्रके वाटून जनतेशी थेट संवाद साधला. गेल्या ८ वर्षातील मोदी सरकारच्या राजवटीत महागाई, भ्रष्टाचार व बेरोजगारीने उच्चांक गाठला आहे. सर्वसामान्य नागरिकांचे जगणे मुश्किल झाले आहे असा आरोप सामंत यांनी केला.
शेतकरी, कष्टकरी, कामगार, युवक, महिला आदींसह सर्व घटक भाजपच्या कारभारावर नाराज असल्याने काँग्रेसने राज्यपातळीवर हाथ से हाथ जोडो अभियान सुरु केले आहे. भाजप दोन उद्योगपतींसाठी देश चालवित असून गोरगरीब जनतेला वाऱ्यावर सोडले असल्याचा आरोप प्रदेश सरचिटणीस भावना जैन यांनी केला. यावेळी सरचिटणीस आनंद सिंह, माजी उपमहापौर सय्यद नूरजहाँ हुसैन सह माजी नगरसेविका गीता परदेशी, रुबिना शेख, महिला अध्यक्ष रूप पिंटो, वेलेरिन पांडरीक, प्रवक्ते प्रकाश नागणे सह पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.