मीरा रोड : मीरा-भाईंदरमध्ये सांडपाणी वाहून नेणाऱ्या नाल्यांच्या शेजारी सर्रास पालेभाज्यांचे मळे फुलवले जात आहेत. गटारांच्या दूषित पाण्यावर पिकवलेली ही भाजी खुल्या बाजारात विकली जात असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. महापालिका प्रशासन आणि लोकप्रतिनिधींच्या डोळ्यांदेखत हा प्रकार घडत असूनही त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. या प्रकाराला वेळीच आवर न घातल्यास शहरातील नागरिकांना आरोग्याच्या गंभीर समस्यांना तोंड द्यावे लागण्याची भीती व्यक्त केली जात आहे. याप्रकरणी महापालिका आयुक्त, नवघर, भाईंदर, नयानगर पोलीस ठाण्यात तक्रारअर्ज देण्यात आला आहे.
भाईंदर पश्चिमेला रेल्वेमार्गालगत आणि मीरा रोड आणि भाईंदर पश्चिमदरम्यान असलेल्या खाडीलगत भाजीपाला लागवड केली जात आहे. शहराचे सांडपाणी या नाला-खाडीतून जात असून याच पाण्यात पाइप टाकून पंपाने पाणी खेचून ते पालेभाज्या पिकवण्यासाठी वापरले जात आहे. भार्इंदर पूर्व ते मीरा रोड पूर्व या रेल्वेमार्गालगत असलेल्या मोकळ्या जागेत गटारांच्या पाण्यावर भाजीपाला लावला जात आहे. मीरा रोड पश्चिमेस जाफरी खाडीलगत सांडपाण्यावरच पालेभाज्या लावल्या जात आहेत.
भाईंदर पूर्वेच्या नवघर येथेही शंकर नारायण महाविद्यालयाच्या ताब्यातील मैदान भागात भाजीपाला लागवड केली जात आहे. या नाले व खाडीत शहराचे मलमूत्र, सांडपाणी सोडले जात असून हे पाणी अत्यंत प्रदूषित व दुर्गंधीयुक्त आहे. मानवी आरोग्यास हे प्रदूषित सांडपाणी घातक आहे. त्याचा वापर हा सर्रास पालेभाज्या आणि भाज्या पिकवण्यासह त्या धुण्यासाठी केला जात आहे. या भाज्यांची बाजारात खुलेआम विक्री केली जात आहे. मलमूत्र-सांडपाण्यावर पिकवल्या गेलेल्या या भाज्या खाऊन नागरिकांच्या आरोग्याला गंभीर धोका निर्माण होत आहे.
...तर हे भाजीपाल्याचे मळे आम्हीच उद्ध्वस्त करू!
सांडपाण्यावर भाज्या पिकवणाऱ्यांविरोधात महापालिका आणि पोलिसांनी कारवाई करून संबंधितांवर गुन्हे दाखल करावे. त्यांचे पंप, पाइप आदी साहित्य जप्त करावे. हे भाजीचे मळे उद्ध्वस्त करावे, अशी मागणी पेंडुरकर यांनी केली आहे. पालिका आणि पोलिसांनी कारवाई केली नाही, तर गटारांच्या घातक पाण्यावर पिकणारे हे भाज्यांचे मळे आम्ही उद्ध्वस्त करू, असा इशारा पेंडुरकर यांनी दिला आहे.