मीरारोड - मीरा भाईंदर महापालिका आयुक्त संजय काटकर यांनी शहर स्वच्छतेसाठी नागरिकांना प्राधान्य देत ' ना कचरा फेकणार , ना फेकू देणार ' अशी मोहीम सुरु केली आहे . तर १६ ऑक्टोबर पासून पालिकेने रोज चालवलेल्या विशेष स्वच्छता मोहिमेचे १० दिवस पूर्ण झाले असून आणखी ९ दिवस मोहीम चालणार आहे.
पालिकेने नागरिकांच्या पुढाकाराने चालवलेल्या ना कचरा फेकणार, ना फेकू देणार मोहिमेला चांगला प्रतिसाद मिळेल अशी खात्री प्रशासनाला आहे . त्यासाठी महिला , पालिका अधिकारी - कर्मचारी सह स्वयंसेवी संस्था, शाळा - महाविद्यालये, एनएसएसचे विद्यार्थी तसेच गृह संकुले , झोपडपट्टी व गावठाण मधील रहिवाशी , रिक्षा चालक आदींना सहभागी करून घेण्यात आले आहे . रस्ते - पदपथ व सार्वजनिक ठिकाणी कचरा, डेब्रिस टाकण्यास मनाई , प्लास्टिक बंदी , सांडपाणी प्रक्रिया , बॅनर मुक्त शहर , ओला व सुका कचरा वर्गीकरण आदी विविध मुद्द्यांवर महापालिकेने मोहीम चालवली आहे.
विकासकांना सुद्धा सहभागी करून घेतले जात असून लता मंगेशकर नाट्यगृहात झालेल्या कार्यक्रमात डीबी रियाल्टीचे राजीव अग्रवाल यांनी, समाज, महापालिका आणि उद्योग एकत्र येऊन काम केल्यास शहर स्वच्छ , सुंदर व प्रगतिशील बनेल असा विश्वास व्यक्त केला. मीरा भाईंदर हे देशातील पहिल्या क्रमांकाचे हरीत स्वच्छ शहर होण्यासाठी सामुहिक प्रयत्न व लोकांमध्ये स्वच्छतेचा विचार बिंबवणे हे मुख्य उदिष्ट आहे. विशेष मोहिमेत ३५० टन पेक्षा जास्त कचरा गोळा करण्यात आला. १० दिवसात जवळपास ३०४ किलो प्लास्टिक जप्त करून ७ लाखापेक्षा जास्त दंड वसुल केला आहे . नागरिक व व्यावसायिकांनी प्लास्टिकला पर्याय म्हणून कापडी बॅग सोबत बाळगणे अनिवार्य आहे. त्यामुळे पर्यावरणाचा ऱ्हास नक्की थांबेल असे आयुक्त संजय काटकर म्हणाले.