मीरा रोड - लघु पाटबंधारे विभागाने पाण्याच्या पुढील नियोजनासाठी पाणीकपात लागू केली असून, मीरा-भाईंदर शहराची पाणीकपात देखील शुक्रवारी ५ जानेवारीपासून सुरू करण्यात आली आहे. दर १५ दिवसांनी म्हणजेच पुढील शुक्रवार वगळता पुन्हा पुढच्या शुक्रवारी अश्या पद्धतीने हि पाणी कपात असल्याने नागरिकांनी पाणी जपून वापरण्याचे आवाहन पालिका पाणीपुरवठा विभागाने केले आहे .मीरा-भाईंदर शहराला सध्या महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून ९० ते ९२ दशलक्ष लिटर तर स्टेम प्राधिकरणाकडून ८६ दशलक्ष लिटर असा मिळून १७६ दशलक्ष लिटर पाणीपुरवठा रोज रोज होत आहे. मीरा-भाईंदर हे टेलएन्ड ला असल्याने या आधी देखील पाणी कपातीतून मीरा भाईंदरला वगळण्यात येत होते .दरम्यान पावसाळा सुरू होईपर्यंत बारवी व उल्हास नदी जलस्त्रोतातील पाणी पुरवावे लागणार असल्याने पाण्याच्या नियोजनाकरिता लघु पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता यांनी २७ डिसेंबरपासून दोन आठवड्यांतून एक दिवस म्हणजेच पंधरा दिवसांतून एका शुक्रवारी बारवी धरणातून २४ तास पाणीपुरवठा बंद ठेवण्याच्या सूचना दिलेल्या आहेत.सदर पाणी कपात अंमलात आणण्यासाठी मीरा-भाईंदर शहरास होणारा महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचा पाणीपुरवठा शुक्रवार ५ जानेवारी व त्यापासून दर १५ दिवसांनी म्हणजेच शुक्रवारी बंद ठेवण्यात येणार आहे. गुरुवारी रात्री १२ ते शुक्रवारी रात्री १२ वाजेपर्यंत २४ तासाकरिता पाणी बंद राहणार असल्याने पाणी कपातीनंतर पुढील दोन दिवस पाणीपुरवठा उशिराने व कमी दाबाने होईल. त्यामुळे नागरिकांनी पाणी काटकसरीने वापरावे तसेच पाण्याचा पुरेसा पाणीसाठा करून ठेवावा, असे आवाहन पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता सुरेश वाकोडे यांनी केले आहे. येत्या शुक्रवारची पाणी कपात ही फक्त एमआयडीसीकडून होणाऱ्या ९० दशलक्ष लिटर पाणी पुरवठ्यासाठी असली तरी त्या नंतरची १५ दिवसांनी होणारी पाणी कपात ही एमआयडीसी सह स्टेमकडून होणाऱ्या पाणी पुरवठ्यास देखील लागू होणार असल्याचे वाकोडे यांनी सांगितले .
मीरा-भाईंदरमध्ये शुक्रवारपासून पाणीकपात
By ऑनलाइन लोकमत | Published: January 03, 2018 7:44 PM