- सदानंद नाईक
उल्हासनगर : महापालिकेच्या पाश्वभूमीवर रिपाईतील विविध गटासह, बीएसपी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची रविवारी रात्री मयूर हॉटेल मध्ये बैठक संपन्न झाली. आंबेडकरवादी विचाऱ्याच्या पक्षांनी एकत्र निवडणूक लढण्या बाबत चर्चा झाली असून विविध पक्षाचे आजी-माजी नगरसेवक यावेळी उपस्थित होते.
उल्हासनगरात रिपाइं (आठवले गट) पक्ष भाजप सोबत असतांना, पक्षातील काही जुन्या निष्ठावंत पदाधिकार्यांनी पुढाकार घेऊन रविवारी रात्री मयूर हॉटेल मध्ये महापालिका निवडणुकीच्या पाश्वभूमीवर रिपाइंतील रिपाइं गवई गट, रिपाइं कवाडे गटासह बीएसपी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक बोलाविली होती. बैठकीत आंबेडकरवादी सरणीच्या पक्षानी एकत्र येत निवडणुकीला सामोरे जाण्या बाबत चर्चा झाली. निवडणूकीची तारीख जाहीर होण्यापूर्वी आंबेडकरवादी सरणीच्या नेत्यांनी सर्वानुमते पक्षाच्या ताकदीनुसार जागा वाटप करावे. तसेच जास्तीत जास्त नगरसेवक निवडून आणण्याचा निर्धार यावेळी सर्वानुमते घेण्यात आला. मात्र महापालिका निवडणुकी पर्यंत हे पक्ष एकत्र राहतील का? असा प्रश्न विरोधकांकडून उपस्थित केला जात आहे.
सर्वपक्षीय बैठकीला रिपाइं आठवले गटाचे प्रदेश सचिव नाना पवार, माजी जिल्हाध्यक्ष अरुण कांबळे, माजी नगरसेवक जे. के. ढोके, राजू सोनावणे, शांताराम निकम, महासचिव गंगाधर मोहोड, अविनाश अहिरे, अंबु वाघ, प्रकाश कांबळे, पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे ठाणे जिल्हाध्यक्ष व नगरसेवक प्रमोद टाले, युवानेते सुनील सोनवणे, संतोष रोकडे, रिपाइं (गवई) गटाचे सर्वेसर्वा व माजी नगरसेवक प्रशांत धाडे, बहुजन समाज पक्षाचे अनिल खंडागळे, हरी सोनवणे, स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे बाळाराम जाधव, बी. डी. धनगर, योगेश वानखेडकर तसेच नाना बिऱ्हाडे, जॉनी डेव्हिड आदी पदाधिकारी उपस्थित होते. चौकट रिपाइं आठवले गटातील वाद चव्हाट्यावर? शहर रिपाइं (आठवले) पक्षाचे शहरजिल्हाध्यक्ष व उपमहापौर भगवान भालेराव यांनी पक्षाचा ६४ वा वर्धापनदिन रिजेन्सी अंटेलिया येथील हॉल मध्ये आयोजित केला होता. कार्यक्रमाला पक्षाचे अध्यक्ष व केंद्रीयमंत्री रामदास आठवले, कपिल पाटील, आमदार गणपत गायकवाड, कुमार आयलानी यांच्यासह रिपाइं व भाजप मधील पदाधिकारी उपस्थित होते. मात्र पक्षाचे असंख्य पदाधिकारी व माजी नगरसेवकांनी दांडी मारल्याने, पक्षातील वाद उफाळून आला आहे.