कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिकेतील धोकादायक इमारतीमध्ये राहणाऱ्या नागरिकांच्या पुनर्वसनासाठी लवकरच मुख्यमंत्र्यांसोबत बैठक होणार आहे, अशी माहिती महापौर राजेंद्र देवळेकर यांनी दिली. महापौरांनी त्याबाबत मुख्यमंत्र्यांना पत्र दिल्यानंतर त्यांनी लवकरच बैठक घेतली जाईल, असे आश्वासन त्यांना दिले.महापालिका क्षेत्रात ६५० पेक्षा जास्त धोकादायक इमारती आहेत. या धोकादायक इमारतींसाठी ठोस धोरण नसल्याने धोकादायक इमारतीच्या पुनर्वसनाचा प्रश्न तूर्त अधांतरी आहे. धोकादायक इमारतींच्या पुनर्वसनासाठी राज्य सरकारने काढलेला जीआरनुसार केवळ अधिकृत इमारती ज्या धोकादायक झालेल्या आहेत, तसेच त्या भाडेकरुव्याप्त आहेत; त्यांचेच पुनर्वसन होईल, असे स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे धोकादायक अनधिकृत इमारतींचा प्रश्न अनुत्तरीतच आहे. तसेच खाजगी सहकारी सोसायट्यांच्या धोकादायक इमारतींचा प्रश्नही सुटणार नाही. कारण त्यात भाडेकरु नाहीत. त्या स्वत:च्या मालकीच्या आहेत. त्यामुळे त्यातील नागरिकांनाही पुनर्वसनाचा लाभ दिला जावा, असा मुद्दाही समोर आला आहे. (प्रतिनिधी)
धोकादायक इमारतीप्रश्नी मुख्यमंत्र्यांसोबत बैठक
By admin | Published: May 04, 2017 6:01 AM