कल्याण : केडीएमसीच्या शिक्षण समितीच्या सभेला शनिवारी सदस्यांनी दांडी मारल्याने सभापती नमिता पाटील यांना सभा रद्द करावी लागली. सदस्यांच्या गैरहजेरीबाबत पाटील यांनी नाराजी व्यक्त केली आहे. तसेच रद्द झालेली सभा पुढील आठवड्यात घेण्याचे आदेश त्यांनी महापालिका सचिव संजय जाधव यांना दिले.
केडीएमसीच्या शाळांमधील वर्गखोल्या खाजगी संस्था तसेच शाळांना भाडेतत्त्वावर देण्याचे प्रस्ताव शिक्षण समितीच्या सभेत मान्यतेसाठी प्रशासनाने दाखल केले होते. सकाळी ११ वाजता ही सभा महापालिका मुख्यालयातील स्थायी समितीच्या सभागृहात होणार होती. सचिव जाधव, शिक्षण विभागाचे उपायुक्त मिलिंद धाट आणि अन्य अधिकारी सभागृहात वेळेवर दाखल झाले.
सभापती पाटील या सभेसाठी सकाळी ११ वाजता महापालिकेत आल्या होत्या. मागील सभेला सदस्य उशिरा आले होते. त्यामुळे सकाळी ११.३० पर्यंत सदस्य येतील, अशी अपेक्षा पाटील यांना होती. परंतु, ११.४५ च्या सुमारास मनसेचे सदस्य प्रभाकर जाधव यांच्याव्यतिरिक्त अन्य कोणीही सदस्य सभागृहात फिरकला नाही. १२ वाजून गेले तरी अन्य सदस्य न आल्याने पाटील यांना सभाच रद्द करावी लागली. पाटील यांनी १२ जूनला सभापतीपदाची सूत्रे हाती घेतली. तेव्हापासून समितीच्या केवळ दोनच सभा झाल्या आहेत.
समितीत एकूण ११ सदस्य आहेत. २९ जूनला झालेल्या पहिल्या सभेला ११ पैकी सहाच सदस्य उपस्थित होते, तर ३१ आॅगस्टला झालेल्या सभेला सात सदस्यच उपस्थित होते. गणसंख्यापूर्तीसाठी कमीतकमी चार सदस्य सभेला उपस्थित राहावेत, असा नियम आहे. अन्यथा, पुरेशा गणसंख्येअभावी सभा रद्द करावी लागते. दरम्यान, शनिवारच्या सभेला सदस्य जाधव यांच्याव्यतिरिक्त अन्य कोणीही सदस्य फिरकले नाहीत.
सदस्या फिरल्या माघारी
सभा रद्द झाल्यावर दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास सदस्या छाया वाघमारे यांच्यासह अन्य एक सदस्या महापालिकेत दाखल झाल्या होत्या. परंतु, सभा रद्द झाल्याचे कळल्यावर त्यांना माघारी परतावे लागले.