उल्हासनगर : रस्त्याच्या पदपथ अतिक्रमण कारवाई नंतर महापालिका प्रशासन व व्यापारी आमने-सामने आल्यानंतर आयुक्त अजीज शेख यांनी महापालिका सभागृहात संयुक्त बैठकीचे आयोजन शुक्रवारी केले होते. बैठकीला आमदार कुमार आयलानी, आयुक्त अजीज शेख, अतिरिक्त आयुक्त जमीर लेंगरेकर, व्यापारी संघटना नेते यांच्यासह विविध पक्षाचे प्रमुख उपस्थित होते.
उल्हासनगरात व्यापाऱ्यांच्या आक्रमक भूमिकेने, महापालिका प्रशासन, पोलीस आमने-सामने आल्याचे चित्र शहरात निर्माण झाले. गुरवारी अतिरिक्त आयुक्त जमीर लेंगरेकर यांनी व्यापाऱ्यांच्या बैठकीत राजकीय नेते कारवाई करण्याचे सांगतात. मात्र व्यापाऱ्यांच्या समोर कारवाईला विरोध करतात. असे राजकीय नेत्यांना सुनावल्याने, नेत्यांचा दुतोंडीपणा उघड झाला होता. आयुक्तानी शुक्रवारी बोलविलेल्या बैठकीला आमदार कुमार आयलानी, भाजपाचे शहरजिल्हाध्यक्ष प्रदीप रामचंदानी, व्यापारी नेते जगदीश तेजवानी, दीपक छतलानी, सुनील सुखेजा, लखी नाथानी, दिनेश पंजाबी, नरेश ठारवानी, दिनेश मिरचंदानी यांच्यासह मनसेचे, बँडू देशमुख, सचिन कदम, दिलीप थोरात संजय घुगे आदीजन उपस्थित होते.
महापालिका आयुक्त अजीज शेख यांनी बोलविलेल्या बैठकी मध्ये कल्याण-अंबरनाथ रस्त्यावरील अतिक्रमण, शहरातील रस्ते पदपथावर अतिक्रमण, पार्किंग व्यवस्था, दुकानावरील पाट्या मराठी मध्ये लिहिणे, दुकान परवाना घेणे आदी विषयावर चर्चा करण्यात आली. आमदार कुमार आयलानी, महापालिका अतिरिक्त आयुक्त जमीर लेंगरेकर, भाजप शहरजिल्हाध्यक्ष प्रदीप रामचंदानी, महापालिका अधिकारी विनोद केणी व पोलीस अधिकाऱ्यांनी यावेळी मार्गदर्शन केले. तसेच वेळोवेळी संयुक्त बैठक घेणार असल्याची माहिती आयुक्त अजीज शेख यांनी दिली आहे.