उल्हासनगर : भाटिया चौकातील अर्धवट रस्त्याच्या कामावरून शिवसेना शिंदे गटाचे आमदार बालाजी किणीकर व राष्ट्रवादी अजित पवार गटाचे भारत गंगोत्री आमने-सामने येऊन एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केले आहे. शहर पूर्वेतील विकास कामाबाबत आमदार किणीकर यांनी आयुक्त अजित शेख यांच्या सोबत बैठक घेतली आहे.
उल्हासनगर कॅम्प नं-५, भाटिया चौक ते गाऊन मार्केट रस्त्याच्या अर्धवट कामाची पाहणी शिवसेना शिंदे गटाचे आमदार बालाजी किणीकर यांनी महानगरप्रमुख राजेंद्र चौधरी, शहरप्रमुख रमेश चव्हाण यांच्यासह पाहणी करून, राष्ट्रवादी अजित पवार गटाचे स्थानिक नगरसेवक भारत गंगोत्री यांच्यावर टीकास्त्र सोडले. आमदार किणीकर यांची टीका जिव्हारी लागल्याने, गंगोत्री यांनी पत्रकार परिषद घेऊन आमदार एकाच रस्त्याला टार्गेट करीत असल्याचे सांगितले. मात्र गेल्या एका वर्षात कोट्यवधी शहर विकास कामाला मंजुरी मिळाली. मात्र त्यांच्या कामाला सुरुवात झाली नाही. त्याबाबत मुंग गिळून बसल्याची टीका गंगोत्री यांनी आमदार किणीकर यांच्यावर केली.
शहरातील दसरा मैदानातील क्रीडा संकुलाचे काम किती वर्षांपासून सुरू आहे, व्हिटीसी मैदानातील शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे क्रीडा संकुलाचे काम, डम्पिंग ग्राऊंड शेजारील प्लॉट नं-३११ जवळील १० कोटीच्या निधीतील रस्त्याला मुहूर्त नाही. असे अनेक प्रश्न गंगोत्री यांनी उपस्थित केले. शिवसेना शिंदे गटाचे आमदार किणीकर व राष्ट्रवादी अजित पवार गटाचे भारत गंगोत्री हे आमनेसामने उभे ठाकल्याने, विकास कामाची स्थिती नागरिकांना मिळाली आहे.
आयुक्ताकडे बैठक शिवसेना शिंदे गटाचे आमदार बालाजी किणीकर, महानगरप्रमुख राजेंद्र चौधरी, शहरप्रमुख रमेश चव्हाण यांच्यासह पक्षाच्या पदाधिकार्यांनी विकास कामाबाबत आयुक्त अजीज शेख यांच्या सोबत गुरवारी आयुक्त कार्यालयात बैठक घेतली. यावेळी भाटिया चौक अर्धवट रस्त्याच्या विषयावर खडाजंगी झाल्याचे समजते.