ठाणे : अद्याप उन्हाळा सुरु झाला नसतांना ठाण्यातील अनेक भागांना पाणीकपातीचा सामना करावा लागत असल्याने त्याचे पडसाद बुधवारच्या स्थायी समितीच्या बैठकीत उमटले. त्यातही दिवा -मुंब्रा सारख्या भागात तर पाचपाच दिवस पाणी येत नसल्याच्या मुद्दा बैठकीत चांगलाच गाजला. एकीकडे नागरिक पाणी नाही म्हणून त्रस्त असतांना दुसरीकडे ज्या इमारतींना ओसी नाही, त्यांना पाणीपुरवठा कसा केला जातो असा सवाल सदस्यांनी केला. पाणी प्रश्नावरून सदस्यांनी आक्रमक धरल्यानंतर अखेर या प्रकरणाची चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश सभापती राम रेपाळे यांनी दिले.दिव्यातीलशिवसेनेचे नगरसेवक शैलेश पाटील आणि मुंब्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक शानू पठाण यांनी त्यांच्या भागातील पाणी समस्येचा पाढा वाचला. येथील काही भागांमध्ये पाच पाच दिवस पाणी येत नसल्याचे त्यांनी निदर्शनास आणले. महापालिका हद्दीत पाणी प्रश्न गंभीर रूप धारण करत असल्याने त्याचे नियोजन आतापासूनच करणे गरजेचे असल्याचे मत पाटील यांनी व्यक्त केले. तर शिवसेनेच्या नगरसेविका विमल भोईर यांनी नागरिकांना पाणी मिळत नसल्याने ते हैराण असल्याचे सांगून वर्तकनगर परिसरात ओसी नसताना काही इमारतींना पाणीपुरवठा केला जात असल्याचा आरोप केला. परंतु, तोमहापालिकेच्या जलवाहिनीतून केला जात नसून मुंबई महापालिकेच्या जलवाहिनीतून होत असल्याच्या प्रशासनाच्या उत्तराने सदस्यांचे समाधान झाले नाही, त्यांनी हा मुद्दा आणखी लावून धरला. अखेर सभापती रेपाळे यांनी या प्रकरणाची चौकशी करून त्याचा अहवाल स्थायी समितीपुढे सादर करावाख असे आदेश प्रशासनाला दिले.पोहण्यासाठी पिण्याचे पाणीशिवसेनेच्या नगरसेविका मालती पाटील यांनी महापालिका हद्दीत असलेल्या तरणतलावांना कोणत्या पाण्याचा पुरवठा होतो असा सवाल केला. तरणतलावांना पिण्याचा पाणीपुरवठा केला जातो, परंतु त्याचे रिसायकलिंग करण्यात येत असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले. परंतु, तो थांबवावा अशी मागणी त्यांनी केली.महापालिका हद्दीत अनेक रहिवाशांना पाण्याचे वाढीव बिल येत असल्याचे नजीब मुल्ला यांनी स्पष्ट केले. संगणक विभागाचे स्वरूप कुलकर्णी यांनी सांगितले की, ही बिले काढण्याचे काम ज्या संस्थेला दिले होते, तिचे काम दर्जाहीन होते. त्यांच्याकडून काम काढून घेतले. यावर नरेश म्हस्के यांनी असा प्रकार वारंवार होत असल्याचा आरोप करून वाढीव बिलांवर आक्षेप घेतला.
स्थायी समितीच्या बैठकीत पाणी पेटले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 12, 2018 11:26 PM