सदानंद नाईक
लोकमत न्यूज नेटवर्क
उल्हासनगर : उल्हासनगरमधील अवैध व धोकादायक इमारतींबाबत ठोस निर्णय घेऊन हजारो नागरिकांना बेघर होण्यापासून वाचविण्यासाठी पालकमंत्री व नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या दालनात आज, बुधवारी सायंकाळी चार वाजता बैठक बोलाविण्यात आली आहे. हजारो नागरिकांचे या बैठकीकडे डोळे लागले असून, याबाबत सकारात्मक निर्णय होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
उल्हासनगरातील अवैध व धोकादायक इमारतींचा प्रश्न ऐरणीवर आला असून, यात हजारो जण बेघर होण्याची शक्यता निर्माण झाली. यातून मार्ग काढण्यासाठी सर्वपक्षीय नेते प्रयत्न करीत आहेत. नगरविकास मंत्री व ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी शहरातील अवैध व धोकादायक इमारतीचा प्रश्न सोडविण्यासाठी बुधवारी सायंकाळी चार वाजता मंत्रालयात बैठक बोलाविली आहे. बैठकीला खासदार श्रीकांत शिंदे, आमदार कुमार आयलानी, बालाजी किणीकर, जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त यांच्यासह संबंधित अधिकाऱ्यांना बोलाविले आहे. बैठकीत शहरहिताचा निर्णय होण्याची शक्यता व्यक्त होत असून, नागरिकांचे बुधवारच्या या बैठकीकडे लक्ष लागले.
गेल्या महिन्यात मोहिनी पॅलेस व साईशक्ती इमारत दुर्घटनेत १२ जणांचा बळी गेला होता. त्या पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्त डॉ. राजा दयानिधी यांनी सरसकट १० वर्षे जुन्या १५०० पेक्षा जास्त इमारतीला स्ट्रक्चरल ऑडिटच्या नोटिसा दिल्या. तसेच ११६ धोकादायक इमारतींचे पाणी व वीज पुरवठा खंडित करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाच्या निषेधार्थ भाजप व रिपाइंने महापालिकेवर मोर्चाचे आयोजन केल्यावर, महापालिका धोकादायक इमारतीचे स्ट्रक्चरल ऑडिट करणार तर इतर इमारतीच्या स्ट्रक्चरल ऑडिटसाठी १५ जणांचे संरचनात्मक अभियंत्यांचे पॅनेल तयार केले.
--------------------
चौकट
शिवसेनेने सर्वपक्षीय नेत्यांना सोबत घ्यावे
शहरात धोकादायक इमारतींचा प्रश्न ऐरणीवर आला असून, यावर मार्ग काढण्यासाठी मंत्रालयात एकनाथ शिंदे यांनी आज, बुधवारी बैठक बोलाविली आहे. बैठकीला भाजपचे आमदार गणपत गायकवाड, उपमहापौर भगवान भालेराव, आदींना बोलाविले नसल्याने, त्यांनी नाराजी व्यक्त करून हा प्रकार म्हणजे श्रेय घेण्याचा भाग असल्याची टीका केली.