सदानंद नाईकउल्हासनगर : महापालिका प्रभाग समिती सभापतींच्या गैरहजेरीत चक्क त्यांच्या दिराने सभापतींच्या खुर्चीत बसून अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेतल्याचा प्रकार दोन दिवसांपूर्वी उघड झाला. याबाबत संतप्त प्रतिक्रिया उमटून बैठकीला उपस्थित प्रभाग अधिकाऱ्यांसह सभापतींच्या दिरावर कारवाई करण्याची मागणी होत आहे.
उल्हासनगर महापालिका प्रभाग समिती क्र.-२ च्या सभापती शुभांगी निकम यांनी प्रभाग समिती अधिकाऱ्याची आढावा बैठक दोन दिवसांपूर्वी बोलवली होती. मात्र, बैठकीला समिती सभापती वेळेत न आल्याने, सभापतींचे दीर व ओमी कलानी टीमचे प्रवक्ते कमलेश निकम यांनी चक्क सभापतींच्या खुर्चीत बसून अधिकाऱ्यांची बैठक घेतली. बैठकीला प्रभाग अधिकारी भगवान कुमावत यांच्यासह इतर अधिकारी, कर्मचारी, नगरसेवक व विद्यमान नगरसेवकांचे नातेवाईक उपस्थित असल्याचे सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या फोटोत दिसत आहे. सभापतींच्या खुर्चीत बसून अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेत असलेल्या सभापतींच्या दिरावर तसेच ज्यांच्यासमोर हा प्रकार घडला, ते प्रभाग अधिकारी कुमावत यांच्यावर टीकेची झोड उठली. कुमावत यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी याबाबत काहीएक बोलण्यास नकार दिला, तर महापालिका मुख्यालय उपायुक्त मदन सोंडे यांनी सविस्तर माहिती घेऊन कारवाई करण्याचे संकेत दिले.
याबाबत कमलेश निकम यांना विचारले असता आपण सभापतींच्या खुर्चीत बसलो नसल्याचा खुलासा त्यांनी केला. आढावा बैठकीला सभापती शुभांगी निकम वेळेत न आल्याने अधिकाऱ्यांची अनौपचारिक बैठक घेतल्याची कबुली निकम यांनी दिली. भाजपचे नगरसेवक मनोज लासी यांनी सभापतींच्या खुर्चीत बसून अधिकाऱ्याची आढावा बैठक घेणाऱ्यांवर महापालिका आयुक्तांनी कारवाई करावी, अशी मागणी केली. प्रभाग अधिकाऱ्यांवरही कारवाईची मागणी होत आहे.
नातलगांची लुडबुडपालिकेत ५० टक्क्यांहून जास्त महिला निवडून आल्या आहेत. नगरसेविकांना शहर विकासाचे काम करताना पूर्ण स्वातंत्र्य देणे गरजेचे आहे. मात्र, नगरसेविकांचे नातेवाईक लुडबुड करत आहेत.