डोंबिवली: मेगाब्लॉग आधीच ठरलेला असूनही प्रशासन (आरटीओ आणि वाहतूक) यांच्याकडून योग्य ते नियोजन केलेले दिसत नव्हते. डोंबिवली स्टेशन परिसरात वाहतूक नियंत्रण कक्षापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या रिक्षा थांब्यावर तसेच बाजीप्रभू चौक येथे रिक्षाचालकांकडून सर्रासपणे प्रवाश्यांची लूट चालू होती. डोंबिवली ते कल्याण 200-300 रुपये भाडे आकाराने चालू होते. आरटीओ आणि वाहतूक पोलिसांची मात्र याठिकाणी उपस्थिती नव्हती. एक प्रकारे रिक्षावाल्यांसाठी मोकळे मैदान ठेवले होते, अशी टीका प्रोटेस्ट अगेंस्ट ऑटोवाला या सोशल मीडियावरील ग्रुपमध्ये एका सदस्याने व्यक्त केली आहे.
केडीएमटीने व्यवस्था चांगली केली होती. मात्र, पत्रीपुलावरील वाहतूक कोंडीमुळे बसेस अडकल्या. त्यामुळे बाजीप्रभू चौकात प्रवाश्यांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. त्यामुळे रिक्षावाल्यांचे आयतेच फावत होते.
प्रवाश्यांना प्रवासीबस सेवा कोठून चालू आहे याचे योग्य मार्गदर्शन करण्यासाठी कोणतीही व्यवस्था केलेली नव्हती. त्यामुळे प्रवासी म्हातारी माणसे, स्त्रिया संभ्रमात होते. त्यामुळे गोंधळात अजून भर पडून प्रवासी हताशपणे रिक्षा / बस शोधत फिरत होते. त्यामुळे रिक्षावाल्यांची अजूनच चंगळ झाली.
एकंदरीत व्यवस्थापन योग्य नव्हते. आरटीओ आणि वाहतूक विभाग यांनी लुटालूट करणाऱ्या रिक्षावरील कारवाई करण्यासाठी कोणतीही व्यवस्था केली नव्हती. हे खूपच संतापकारक होते, असेही त्यात नमूद करण्यात आले आहे.