भाईंदर : मीरा- भाईंदर विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी मागणाऱ्या भाजपच्या माजी महापौर गीता जैन यांनी आमदार नरेंद्र मेहता यांची थेट पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्याकडे लेखी तक्रार केली आहे. गणेशोत्सवाच्या शुभेच्छा देणारे जाहिरात फलक अधिकृत होर्डिंगवर लावले असतानाही कंत्राटदारास सांगून भाजप तसेच गणपतीबाप्पाचे फलक मेहतांनी काढायला लावल्यावरुन जैन यांनी तक्रार केली आहे.
मेहतांनी महापालिकेत शिवसेना, बविआ आदींची मोट बांधत वहिनी डिंपल मेहतांना महापौरपदी बसवण्याचा प्रयत्न चालवला होता. परंतु जैन यांनी महापौर पदाची भाजपकडून उमेदवारी मिळवत मोर्चेबांधणी करून मेहतांच्या सहकार्याने महापौर झाल्या. महापौर झाल्यानंतर मेहतांसोबत काही विषय व मुद्दे यावरुन दोघांमध्ये मतभेद टोकाचे वाढत गेल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. जैन यांच्या प्रकल्पात महिला भवन बांधण्याची मंजुरी, जैन यांना पक्षाच्या कार्यक्रम - बैठकांपासून दूर ठेवणे, पक्षाचे गटनेते , जिल्हाध्यक्षा मार्फत जैन यांना नोटीस बजावणे, मेहतांच्या समर्थकांकडून जैन यांना दमदाटी व अपशब्दांचा वापर आदी प्रकार वाढीला लागले. दुसरीकडे जैन यांनीही पक्षातील वरिष्ठांच्या भेटीगाठी घेतानाच मुख्यमंत्र्यांच्या पत्नी अमृता फडणवीस तसेच तत्कालीन प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांना आपल्या कार्यक्रमात आणून मेहतांनाही आपण कमी नसल्याचा इशारा दिला.विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी भाजपातून इच्छुक असलेल्या जैन यांच्या विरोधात आमदार मेहता असा राजकीय वाद व्यक्तीगत पातळीवर जाऊन पोहचला आहे. जैन यांच्या सोनम बिल्डर्सने जाहिरातीसाठी पालिका कंत्राटदार असलेल्या आदित्य अॅडर्व्हटायझिंगकडून काही होर्डिंग कराराने घेतल्या आहेत. १ सप्टेंबर रोजी भाजपच्या वतीने गणेशोत्सवाच्या शुभेच्छा देणारे आठ फलक जैन यांनी लावले होते. त्यातील नयानगर, सिल्वर पार्क, एस.के.स्टोन मार्ग व गोल्डन नेस्ट येथील पाच फलक आदित्य अॅडर्व्हटायझिंगचे दीपक पाठक यांनी काढले. या प्रकरणी जैन यांनी थेट शहा यांच्यापर्यंत मेहतांची तक्रार केली. कार्यकारी अध्यक्ष जे.पी.नड्डा, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, प्रभारी खासदार गोपाळ शेट्टी यांना तक्रारीची प्रत पाठवली. आदित्य अॅडर्व्हटायझिंगशी जैन यांच्या सोनम बिल्डर्सचा होर्डिंगसाठी करारनामा झाला असून त्याचे पैसे आम्ही भरतो. परंतु आ. मेहतांच्या सांगण्यावरून भाजप आणि गणपतीबाप्पाचे फलक उतरवले गेले. इतकेच नाही तर कंत्राटदाराने आपल्या कंत्राटातील निम्मे होर्डिंग मेहतांचे असल्याचे सांगितल्याचा गौप्यस्फोटही जैन यांनी तक्रारीत केला आहे. मी पक्ष आणि पंतप्रधानांच्या विचारांवर चालत असून पक्ष वाढवण्यासाठी कार्यरत आहे. मी संघ परिवार तसेच सहकार भारतीकडून होणाºया कार्यक्रमां मध्ये सहभागी व सहकार्य करत असते. मेहतांनी पक्षाच्या विचारांच्या विपरित कार्य चालवले आहे असे जैन यांनी नमूद केले आहे.जैन यांचे आरोप बिनबुडाचेआ. मेहतांनी मात्र पत्रकारांशी बोलताना आपण पक्षाचे निष्ठावंत असून पक्षाच्या विरोधात विचारही करू शकत नाही. सोनम बिल्डर व होर्डिंग कंत्राटदारातील करारात राजकीय होर्डिंग लावणार नाही असे स्पष्ट नमूद आहे. कदाचित कंत्राटदाराचे पैसे दिले नसतील म्हणूनही फलक काढले असतील असे मेहतांचे म्हणणे आहे. जैन यांचे आरोप बिनबुडाचे असल्याचे ते म्हणाले.मेहतांकडून विविध प्रकारचा त्रासकंत्राटदार आणि आमच्यातील अंतर्गत कराराची माहिती मेहतांना कशी मिळाली ? याच कंत्राटदाराच्या होर्डिंगवर मेहतांचे राजकीय फलक लागतात ते कसे कंत्राटदाराला चालतात ? असे सवाल करत कंत्राटदाराने मेहतांच्या सांगण्या वरुनच भाजप आणि गणपती बाप्पाचे फलक काढले हे स्पष्ट होत असल्याचे गीता जैन म्हणाल्या. मेहता हे विविध प्रकारे मला त्रास देत असून आतापर्यंत आपण तक्रार केली नव्हती. गणपती बाप्पा आणि भाजपचे फलक उतरवल्याने तक्रार करावी लागली.