मीरा रोड : मीरा- भाईंदर विधानसभा मतदारसंघातील अटीतटीची वाटणारी निवडणूक भाजपच्या बंडखोर माजी महापौर गीता जैन यांनी जिंकली. मतमोजणीच्या पहिल्या फेरीपासून त्यांनी आपले मुख्य प्रतिस्पर्धी भाजपचे नरेंद्र मेहता यांच्यावर आघाडी घेतल्याने सकाळी साडेअकरापासूनच मेहता समर्थकांनी मतमोजणी केंद्रावरून काढता पाय घेतला. काँग्रेस समर्थकांनीही कल ओळखला असला तरी मीरा रोडमधून मतांची आशा होती पण ती फोल ठरली.
मोजणी होऊनही मतांची आकडेवारी जाहीर करण्यात विलंब होत असल्याने नेमके काय सुरू आहे हे कळत नव्हते. भाजप, शिवसेना, काँग्रेसचे नगरसेवक, पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच गीता जैन यांचे समर्थक जमू लागले होते. पहिल्या फेरीची मते जाहीर झाली आणि त्यात जैन यांनी आघाडी घेतल्याचे कळताच त्यांच्या समर्थकांनी जल्लोष सुरू केला. त्यानंतरच्या प्रत्येक फेरीला जैन यांची मतांची आघाडी वाढू लागल्याने भाजप व काँग्रेसचे नगरसेवक, पदाधिकारी, कार्यकर्ते यांची चुळबुळ सुरु झाली. जैन यांनी आघाडी घेतल्याचे कळताच त्यांचे समर्थक तसेच सेनेचे नगरसेवक, पदाधिकारी आदींची गर्दी वाढू लागली. दुपारपर्यंत जैन जिंकणार हे चित्र स्पष्ट झाले.
मतमोजणी सुरू झाली तेव्हापासून जैन, मेहता व मुझफ्फर हे प्रमुख उमेदवार केंद्रात फिरकलेच नव्हते. विजय निश्चित झाल्याने मग जैन या आल्या. त्यांचे मोठ्या जल्लोषात सर्वांनी स्वागत केले. शिवसैनिकांनी नाचून आनंद व्यक्त केला. फटाक्यांची आतषबाजी केली गेली.
गीता यांच्या बॅट चिन्हाच्या झेंड्यांसह शिवसेनेचा भगवा व आरपीआयचा झेंडा नाचवत जल्लोष केला.
भाईंदर : सर्वांचे लक्ष लागलेल्या मीरा भार्इंदर विधानसभा मतदारसंघातून भाजपच्या बंडखोर उमेदवार व माजी महापौर गीता जैन यांनी भाजपचे आमदार नरेंद्र मेहता यांना पराभवाची धूळ चारली. शिवाय काँग्रेसचे प्रदेश कार्याध्यक्ष तथा माजी आमदार मुझफ्फर हुसेन यांचाही पराभव केला. मीरा भार्इंदरच्या त्या पहिल्या महिला आमदार ठरल्या आहेत. शिवाय मेहता व मुझफ्फर या दोन दिग्गजांचा पराभव करुन त्या जायंट किलर ठरल्या आहेत.
भाजपने उमेदवारी नाकारल्याने जैन यांनी अपक्ष म्हणून निवडणूक रिंगणात उडी घेतली होती. भाजपने विद्यमान आमदार नरेंद्र मेहतांना उमेदवारी दिल्याने जैन यांनी त्यांना आव्हान दिले होते. अपक्ष म्हणून निवडणूक लढवणाऱ्या जैन यांनी तब्बल ७९ हजार ५२७ मते मिळवली. तर मेहतांना ६३ हजार ९९२ मते मिळाली. हुसेन यांना ५५ हजार ८९९ मते पडली. जैन यांनी मेहतांचा १५ हजार ५३५ मतांनी पराभव केला.