बदलापूर / अंबरनाथ : महिनाभरापासून अंबरनाथ आणि बदलापूर या दोन्ही पालिकांमधील निवडणुकीच्या प्रभागरचनेवरून गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती. आता राज्य शासनाने नगर परिषदांमध्ये पुन्हा बहुसदस्यीय प्रभागपद्धती (पॅनल) रद्द करून एक सदस्य प्रभागपद्धती अवलंबली आहे. त्यामुळे आता निवडणूक आयोगाला शहरातील प्रभागरचना आणि आरक्षणाबाबत नव्याने आदेश काढावे लागणार आहेत.
महापालिकेतील पॅनलपद्धती रद्द झाल्यावर बदलापूर आणि अंबरनाथची प्रभागपद्धतीही रद्द होण्याची अपेक्षा होती. निवडणूक आयोगाने बहुसदस्यीय प्रभागपद्धतीनुसार प्रभागरचना करण्याचे आदेश दिले होते.
त्यामुळे अंबरनाथ आणि बदलापूर या दोन्ही पालिकांमध्ये गोंधळ निर्माण झाला होता. निवडणूक आयोगाने जुन्याच पद्धतीनुसार म्हणजे बहुसदस्य प्रभागरचना अमलात आणून त्यानुसार प्रभाग पाडण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार, १७ जानेवारीला कामही सुरू होणार होते. आता राज्य शासनाने पुन्हा निवडणूक प्रक्रियेत बदल केला आहे. पूर्वीची बहुसदस्यीय प्रभागरचना रद्द करून एकसदस्यीय प्रभागरचना अमलात आणण्याचा निर्णय घेतला आहे.
आता दोन वॉर्डांचा एक पॅनल न करता एकाच वॉर्डाचा एक पॅनल तयार होणार आहे. याआधी २०१५ मध्ये ज्या पद्धतीने प्रभाग पाडले आणि निवडणुका झाल्या, त्याच पद्धतीने पुन्हा निवडणूक होणार आहे. २०१५ च्या निवडणुकीच्या नियमानुसारच या निवडणुका होणार आहेत. त्यामुळे आता राजकीय पक्षांमध्ये असलेला गोंधळ काही प्रमाणात कमी झाला आहे. आता अंबरनाथ आणि बदलापूर शहरांतील राजकीय पुढाऱ्यांना वेध लागले आहेत, ते आरक्षण सोडतीचे. त्यासंदर्भात निवडणूक आयोग काय निर्णय घेणार, हे महत्त्वाचे ठरणार आहे.