अंबरनाथ : शासकीय आयटीआय पनवेल, अंबरनाथ, नागोठणे, महाड आणि इंडियन स्पेशालिटी केमिकल्स मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन यांच्यात ‘जर्मन सोसायटी फॉर इंटरनॅशनल को-ऑपरेशन’ (जीआयझेड) यांच्या मदतीने दुहेरी प्रशिक्षण ‘ड्यूल सिस्टीम ऑफ ट्रेनिंग’ प्रणालीवर सामंजस्य करार झाला आहे. २४ ऑगस्ट रोजी हा करार झाला आहे.
जर्मनीचे आर्थिक सहकार्य आणि विकास मंत्रालय (बीएमझेड) सरकारद्वारे कमिशन केलेले फेडरल एंटरप्राइझ, जर्मन सोसायटी फॉर इंटरनॅशनल को-ऑपरेशन (जीआयझेड) यांनी आयटीआय आणि इंडियन स्पेशॅलिटी केमिकल्स मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन (आयएससीएमए) एकत्र आणण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. या सामंजस्य कराराचा या औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय)मधील रासायनिक आणि संबंधित क्षेत्रातील सुमारे २४ युनिट्सना फायदा होणार आहे.
कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालयाने ‘व्यावसायिक शिक्षण आणि प्रशिक्षणासाठी इंडो-जर्मन कार्यक्रम’ संयुक्तपणे अंमलात आणण्यासाठी, जर्मन सोसायटी फॉर इंटरनॅशनल को-ऑपरेशन (जीआयझेड)सह एक अंमलबजावणी करार केला आहे. त्यानुसार भारतात संयुक्त प्रकल्प राबवला जात आहे. या सामंजस्य करारावर स्वाक्षरी करण्यासाठी, इंडियन स्पेशॅलिटी केमिकल्स मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनचे अध्यक्ष विनय पाटील यांनी प्रतिनिधित्व केले. व्यावसायिक शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय, महाराष्ट्र राज्याचे प्रतिनिधित्व डॉ.अनिल जाधव, संयुक्त संचालक प्रादेशिक कार्यालय, मुंबई आणि शासकीय आयटीआयचे प्रतिनिधित्व प्राचार्य खटावकर, प्राचार्य अजित शिंदे, गटशिक्षक हेमंत बारगळ उपस्थित होते. जीआयझेड आयजीव्हीईटीचे प्रतिनिधित्व डॉ. रॉडनी रेव्हियर (प्रकल्प प्रमुख) आणि तरुण म्हस्के (तांत्रिक सल्लागार) यांनी केले.