मीरा रोड : आपण असंवेदनशील झालो आहोत. पण स्वातंत्र्यसैनिकांचे हे स्मारक असंवेदनशीलता घालवायला आणि मीरा भाईंदरकरांच्या मनात संवेदना जागी करायला मदत करेल असा विश्वास सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे यांनी भाईंदर येथील स्वातंत्र्यसैनिकांच्या स्मारकाच्या भूमिपूजन प्रसंगी व्यक्त केला. युतीमध्येच काम करत राहू, काळजी करू नका असे तावडे आवर्जून म्हणाले.मीरा- भाईंदर महापालिकेच्यावतीने नवघर नाका येथे स्वातंत्र्यसैनिकांचे स्मारक उभारण्यात येणार आहे. शहरात ४० स्वातंत्र्यसैनिक असून एकट्या नवघर गावात २८ स्वातंत्र्यसैनिक आहेत. तर भाईंदर गावातील ५, गोडदेव आणि खारी गावातून प्रत्येकी दोन , तर उत्तन, मीरे व घोडबंदर गावातून प्रत्येकी एक स्वातंत्र्यसैनिक लाभले आहेत. स्वातंत्र्यसैनिकांचे स्मारक व्हावे अशी मागणी अनेक वर्षांपासून होत होती. ज्येष्ठ नगरसेविका प्रभात पाटील यांनी यासाठी पुढाकार घेतला होता. महासभेत सर्वानुमते यास मंजुरी मिळाली होती.प्रजासत्ताक दिनी सायंकाळी या स्मारकाचे भूमिपूजन तावडे यांच्या हस्ते झाले. यावेळी स्वातंत्र्यसैनिक अगस्तीन कोळी व आत्माराम भोईर यांच्यासह खासदार राजन विचारे, महापौर डिंपल मेहता, आमदार प्रताप सरनाईक, नरेंद्र मेहता, नगरसेवक प्रवीण पाटील, वंदना पाटील, संध्या पाटील, अनंत शिर्के आदी उपस्थित होते. मेहता म्हणाले की, ६३ लाख रुपये खर्चून पंचधातूचे हे स्मारक तीन महिन्यात बांधून होईल. यासाठी २५ लाखांचा महापौरनिधी खर्च होईल. घोडबंदर किल्ल्याचे हस्तांतरण व सुशोभीकरण कामाच्या भूमिपूजनासाठी वेळ द्या असे तावडे यांना सांगितले.सरनाईक यांनी यावेळी महापौर व मेहतांना विनंती केली की, स्मारक भर रस्त्यात न उभारता मैदानाच्या जागेत उभारा. जेणेकरून स्मारकाचे पावित्र्य राखले जाईल. घोडबंदर किल्ल्याच्या मंजुरीसाठी तावडेंनी वेळ दिली होती. पण मेहतांनी ती कशी रद्द केली कळले नाही. कधीकधी मेहतांचा पायगुण चांगला असतो. युती असो वा नसो पण स्थानिक आमदार व खासदार म्हणून आमंत्रित करा अशी विनंती त्यांनी केली. नवघर गावातील स्वातंत्र्यसैनिक व भूमिपूत्रांच्या जमिनी सीआरझेड, नाविकास क्षेत्रमधून निवासी क्षेत्रात करण्यास मुख्यमंत्र्यांना विनंती करा असे तावडेंना म्हणाले.युतीमध्येच कामे करत राहू. काळजी करू नका असे सरनाईकांना सांगत घोडबंदर किल्ल्याचे हस्तांतर व सुशोभीकरणाच्या कामास आचारसंहिता लागण्याआधी मंजुरी देऊ. सरकारी शिवजयंतीच्या दिवशी भूमिपूजनाची ग्वाही दिली.तावडे मुख्यमंत्री व्हावेतविनोद तावडेंच्या हातून भूमिपूजन झाले की ते काम पूर्ण होते असे सांगत ते सक्षम मंत्री असून भविष्यात त्यांनी राज्याचे नेतत्त्व करावे अशी इच्छा सरनाईकांनी व्यक्त केली. त्यांच्या या विधानाने उपस्थितांच्या भुवया मात्र चांगल्याच उंचावल्या.सरनाईकांचे पत्रकारांवर खापरसरनाईकांनी मेहतांवर बिल्डरांची सुपारी घेण्यापासून ब्ल्यू फिल्म विक्री पर्यंतचे आरोप केले होते. तर मेहतांनी, रिक्षा चालवणारे सरनाईक अब्जाधीश कसे झालेपासून विहंग हॉटेल पण लॉज असल्याची झोड उठवली होती. पण कार्यक्रमात मात्र नागरिक मेहता आणि माझी जुगलबंदी बघत असतात. मेहता व माझ्यात वाद निर्माण होतील व ते कसे वाढतील यासाठी पत्रकार प्रयत्न करतात असे सांगत सरनाईकांनी पत्रकारांवरच खापर फोडले. यामुळे सरनाईक - मेहतांची आतून युती व बाहेरुन लुटूपुटुची लढाई असल्याची चर्चा सेना-भाजपा कार्यकर्त्यांसह नागरिकांमध्ये रंगली आहे. निवडणूक तोंडावर आल्याने मेहतांची धास्ती सरनाईकांनी घेतल्याचेही बोलले जात आहे.
स्वातंत्र्यसैनिकांचे स्मारक संवेदना निर्माण करेल- तावडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 27, 2019 11:33 PM