लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : कोरोनाचे निर्बंध शिथिल होताच ठाण्यात पुन्हा एकदा शहराच्या विविध भागात फेरीवाल्यांनी उच्छाद मांडला आहे. फेरीवाला धोरणाची अद्यापही अंमलबजावणी झालेली नसतानाही कर्ज मिळणार म्हणून सध्या फेरीवाल्यांची संख्या वाढत आहे. अशा फेरीवाल्यांना राजकीय नेत्यांचे पाठबळ असलेल्या कथित दादांचा राजाश्रय असल्यानेच त्यांनी उच्छाद मांडला असून सोमवारी महापालिकेच्या साहाय्यक आयुक्त कल्पिता पिंपळे यांच्यावरील जीवघेणा हल्ला यातूनच झाला आहे. शहरातील फेरीवाले कुर्ला आणि डोंगरी भागातून येत असल्याची माहिती समोर आली आहे.
ठाणे महापालिका हद्दीत आजही फेरीवाला धोरणाची अंमलबजावणी होऊ शकलेली नाही. दुसरीकडे पंतप्रधान योजनेंतर्गत फेरीवाल्यांना १० हजार रुपये कर्ज दिले जाणार असल्याने त्यासाठी १७ हजार फेरीवाल्यांनी नोंदणी केली आहे. त्यात कोरोनाचे निर्बंध शिथिल झाल्याने शहराच्या विविध भागात फेरीवाल्यांचा आकडा वाढला आहे. शहरातील जांभळीनाका ते स्टेशन परिसरात, वागळे इस्टेट, कळवा, मुंब्रा, दिवा, घोडबंदर, वर्तकनगर, उथळसर आदींसह इतर प्रमुख भागांमध्ये रस्त्याच्या कडेला, फूटपाथवर त्यांची संख्या वाढताना दिसत आहे. त्यामुळे नागरिकांना चालणेदेखील मुश्किल झाले आहे. फेरीवालादादांकडून आश्रय मिळत आहे. याच फेरीवालादादांनी काही महिन्यांपूर्वी फेरीवाल्यांवर कारवाई करू नका असा दम महिला सहायक आयुक्तांना भरला होता. त्यातील अनेक फेरीवाले हे कुर्ला, डोंगरी आदी भागातील आहेत. त्यांच्याकडून दिवसाचा हप्ता घ्यायचा आणि त्यांना राजरोसपणे कुठेही कशाही पद्धतीने परवानगी द्यायची, असा प्रकार ठाण्यात सुरू आहे.
......
महापालिका वारंवार अशा फेरीवाल्यांवर कारवाई करते. स्टेशन परिसरात अतिक्रमण विभागाच्या गाड्यादेखील फिरत आहेत. तसेच आता इतर भागातही अशा अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाई केली जात आहे, परंतु फेरीवाल्यांची दादागिरी अजिबात खपवून घेतली जाणार नाही.
(संदीप माळवी - अतिरिक्त आयुक्त, ठामपा)