नितीन पंडीत
लोकमत न्यूज नेटवर्क
भिवंडी : सकाळी सात वाजल्यापासून रात्री नऊ वाजेपर्यंत शेतात, गोठ्यात, खदाणीत किंवा वीटभट्टीवर राबल्यावर आठवड्याला पती-पत्नीला मिळून केवळ पाचशे रुपये हातावर टेकवणार. कामावर खाडा केला तर २०० रुपये कापून घेणार. याबाबत नाराजी, तक्रार केली तर गुरासारखे बडवून काढणार. मजुरीवरील महिलांना, लहान मुलींना मालिश करण्याचे फर्मान आल्यावर छातीत धस्स व्हायचे. मालिश करण्याकरिता फर्मान म्हणजे अब्रूचे धिंडवडे निघालेच. पिळंझे गावातील चिंचपाडा या आदिवासी पाड्यावरील घराघरात पुरुषांच्या अंगावर मारहाणीचे वळ वेठबिगारीचे वास्तव कथन करीत आहेत तर मान गुडघ्यात घालून स्फुंदून स्फुंदून रडणाऱ्या महिला, मुली त्यांच्यावर ओढवलेल्या प्रसंगाचे नि:शब्द वर्णन करीत आहेत.
मुंबईपासून ४० कि.मी. तर ठाण्यापासून २५ कि.मी. अंतरावर असलेल्या पिळंझे गावात गेली ३५ वर्षे ही वेठबिगारी सुरू असून त्याबाबत कुणीही अवाक्षर काढत नाही. कच्ची घरे, घरात एकावेळी कुटुंबातील सर्वजण बसून जेमतेम भाकरीचे तुकडे मोडू शकतील इतक्या अरुंद झोपड्या, कच्चे रस्ते, अठराविश्वे दारिद्र्य, शिक्षण कोसो दूर, पिण्याच्या घोटभर पाण्याकरिता वणवण अशी अत्यंत हलाखाची परिस्थिती आहे. जगभर उद्योगनगरी म्हणून प्रसिद्ध असलेल्या भिवंडीतील आदिवासी पाड्यावरील हे वास्तव. शहरापासून साधारणतः दहा-बारा किलोमीटर असलेल्या पिळंझे गावातील चिंचपाडा या आदिवासी पाड्याची ही कथा. येथील १८ आदिवासी वेठबिगार कामगारांची दोन दिवसांपूर्वी मुक्तता झाली. महिलेवर बलात्कार तसेच अल्पवयीन मुलीचा विनयभंग या प्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. श्रमजिवी संघटनेने त्याकरिता प्रयत्न केले.
भिवंडी वाडा महामार्गावर असलेल्या अनगाव पिळंझे येथील चिंचपाडा या आदिवासी पाड्यातील हे दाहक वास्तव जाणून घेण्याकरिता ‘लोकमत’ तेथे पोहोचला. गावात सावकार म्हणून वावरणाऱ्या राजाराम काथोड पाटील व चंद्रकांत काथोड पाटील या दोघांच्या दहशतीच्या करुण कहाण्या आदिवासींनी प्रस्तुत प्रतिनिधीला कथन केल्या. महिलांचा शारीरिक व मानसिक छळ, तर पुरुषांना तुटपुंज्या वेतनावर राबवून घेणे व मारहाण करणे हा या गावातील सावकारांचा नित्यनियम असल्याचे आदिवासींनी सांगितले. मजुरांनी काम केले नाही तर त्यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण करणे ही नित्याचीच बाब.
आदिवासी पती-पत्नीला आठवड्याला केवळ पाचशे रुपये वेतन देऊन त्यांच्याकडून दिवसभर काम करून घेणे, तब्बेत बरी नसली किंवा अन्य अडचणीमुळे एखादा दिवस कामावर खाडा केला तर किमान २०० रुपये कपात. सतत मारहाण, दडपण व याची वाच्यता कुठे केली तर अमानुष मारहाण. पोलिसांकडे कुणी तक्रार केली तर पोलीस सावकारांचे मिंधे. त्यामुळे सावकाराची मोठी दहशत निर्माण झाली होती.
सावकारी पाशातून सुटका झाली खरी; मात्र आता त्यांच्यासमोर उदरनिर्वाहाची मोठी समस्या निर्माण झाली आहे. शासनाने आमच्या उदरनिर्वाहासाठी पुढाकार घ्यावा व आमच्यावर अन्याय करणाऱ्या दोघा सावकारांना कठोर शिक्षा करावी, अशी मागणी येथील आदिवासी बांधव व महिलांनी केली.
.............